मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुप्रिया सुळे अध्यक्षा बनणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतून तीव्र पडसाद उमटले होते. शरद पवार यांनी मात्र, आपला राजीनामा देण्यावर कायम असल्याचे म्हटले होते. तरीही दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, असेही म्हटले होते. मात्र, बुधवार, ३ मे रोजी सकाळी सुप्रिया सुळे यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे येऊ लागले.
सुप्रिया सुळे सध्या कर्नाटक निवडणूकांच्या प्रचारासाठी जाणार होत्या. मात्र, हा दौरा रद्द झाल्या आहेत. यावर छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. सुप्रिया सुळेंकडे केंद्राची व अजित पवारांकडे राज्याची जबाबदारी देण्यात यावी, असाही त्यांनी दिला आहे. पवारांच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीत हा अधिकृत निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या प्रकारे रोष सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात होता, तसेच नकाराचा सूर जसा राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांकडून घेतला जात होता, त्याउलट प्रतिक्रीया आता नेत्यांनी देण्यास सुरुवात केली आहे.
सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती!
सुप्रियाताई पक्षाच्या अध्यक्ष व्हाव्यात, अशी प्रतिक्रीया आता सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत उमटू लागल्या आहेत. त्यामुळे शरद पवारांचा राजीनामा या विषयावर राष्ट्रवादीतर्फे पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. २४ तासांत हा बदल झाल्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांनी नेमक्या उलट प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या फौजिया खान यांनीही पवारांनी मागून घेतलेल्या दोन दिवसांच्या वेळेचा आदर करत आहोत. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही त्या म्हणाल्या. असा अंदाज बांधण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या. सुप्रियाताईंना अध्यक्षपद मिळाले तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.