बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा

नैसर्गिक पद्धतीने हापूस उत्पादनच फायदेशीर!

    13-May-2023   
Total Views |
dilip k

कोकणातील हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली. यंदा कोकणातील आंब्याचे उत्पादन अवघे १६ ते २८ टक्के असून मागील सहा वर्षांच्या तुलनेतील हे सर्वात कमी उत्पादन आहे. तसेच बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीमुळेही आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होईल, असाही एक मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. त्यामुळे कधीकाळी कोकणच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या हापूस आंब्याचे बदललेले अर्थकारण आणि हापूसच्या उत्पादनामुळे कोकणच्या पर्यावरणासह जैवविविधतेवर होणारे विपरीत परिणाम, याविषयी ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि गेल्या ३० वर्षांपासून कोकणात वास्तव्य असलेल्या दिलीप कुलकर्णी यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

हापूस आंब्याच्या उत्पादनामुळे कोकणच्या पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचाही दावा केला जातो. त्याकडे तुम्ही कसे बघता?

होय, या दाव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हापूस आणि एकंदर आंब्याच्या उत्पादनामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेला नुकसान होत आहे, हे आपण नाकारू शकत नाही. हापूसची कलमे लावण्यासाठी डोंगरावर असलेली जंगले साफ करून वृक्षतोड केली जाते. गुंठ्याला एक याप्रमाणे हापूसची लागवड करावी लागत असल्याने त्या भागातील गवतासह उर्वरित सगळी झाडे काढून टाकावी लागतात, ज्याचा थेट परिणाम निसर्गावर होतो. त्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होतेच. कुठलेही झाड लावले म्हणजे पर्यावरण संवर्धन केले असे होत नाही. कुठली झाडे लावली पाहिजेत, जेणेकरून पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण होईल, याचा अभ्यास करून वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. एकाच झाडापासून बनलेली १०० झाडे लावण्याची पद्धत सुरु झाल्याने त्या १०० झाडांमुळे जैवविविधता किंवा पर्यावरणाला आवश्यक ते पोषक घटक उपलब्ध होत नाही. या १०० हापूसच्या झाडांवर होणारी विषारी केमिकल्सची फवारणी आणि त्यातून होणारे दुष्परिणाम, या सगळ्याचे सार म्हणजे हापूसच्या लागवडीमुळे पर्यावरणाचे होणारे मोठे नुकसान; हे आपल्याला मान्य करावे लागेल.

हवामानाचे परिणाम, आंब्याची मुंबईला करावी लागणारी वाहतूक व त्यासाठी लागणारा खर्च आणि अशाच अन्य बाबींचा हापूसच्या अर्थकारणावर परिणाम होतो का? यावर्षी केवळ १६-१८ टक्के हापूस उत्पादन कोकणात झाल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा, हापूसमुळे कोकणाचे अर्थकारण चालते, हा समज कितपत खरा आहे?

हापूसमुळे संपूर्ण कोकणाला पैसा मिळतो हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पण, काही निवडक आणि मोजक्या बागायतदारांना आणि उत्पादकांना याचा नक्कीच खूप मोठा फायदा होतो, हे देखील नाकारून चालणार नाही. परंतु, केवळ हापूस उत्पादन या एकमेव उत्पादनातून ते नफा कमवितात, हे सांगणेही तितकेच अयोग्य ठरेल. आंबा उत्पादनासोबतच त्याचा साठा करणे, त्याचे बायप्रॉडक्ट्स तयार करणे आणि यासारखे उद्योग केल्यामुळे काही निवडक मंडळींना फायदा होतोच, जो मर्यादित आहे. पण, कोकणात काही मंडळींकडे एकही आंब्याचे झाड नाही, अशीही परिस्थिती दुसरीकडे आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणचे अर्थकारण हापूसवरच अवलंबून आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. यंदा कोकणाला हापूस उत्पादनात मोठा फटका बसला आहे. हापूस दिसणेही मुश्किल झाले आहे इतकी वाईट परिस्थिती कोकणात हापूसच्या संदर्भात दिसते. याउलट परिस्थिती मागील वर्षी होती, यावर्षी केवळ १८ टक्के हापूस उत्पादन झाले, अशी सध्याची आकडेवारी सांगते. पण, मुळातच हापूस हा एक वर्षाआड येणार आंबा आहे. त्यामुळे जर मागील वर्षी त्याचे उत्पादन अधिक झाले असेल, तर यावर्षी ते कमी होणार, याची जाणीव हापूस उत्पादकांना असतेच. त्यामुळे त्यात नवीन असे काही नाही. हापूस उत्पादनाला हवामानाचा फटका बसला का? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आताच त्यावर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल.

हवामान मानवत असलेली हापूस ही कोकणातील मूळ वृक्षप्रजाती नाही. त्यामुळे मोहर धरण्यापासून ते कीटकांपासून फळाचे रक्षण करण्यापर्यंत हापूसवर अनेक रासायनिक फवारण्या कराव्या लागतात. या रासायनिक फवारण्यांचे काही दुष्परिणाम होतात का?

अगदी बरोबर. हापूसचे बी पेरून त्याचे उत्पादन घेता येत नाही. त्यासाठी हापूसचे कलम लावावे लागते. हापूसवर कराव्या लागणार्‍या रासायनिक फवारण्यांचे निश्चितच दुष्परिणाम भोगावे लागतात, हे नाकारून चालणार नाही. हापूसवर उत्पादन घेत असताना खतांच्या तीन फवारणी कराव्या लागतात - बाह्य फवारणी, धुराद्वारे केली जाणारी फवारणी आणि अंतर्प्रवाह फवारणी. अशा फवारण्या हापूसवर केल्या जातात. ही फवारणी केल्याने झाडाच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो, हे नाकारून चालणार नाही. जर हापूसवर या फवारणीचा परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर फळ काढण्याच्या किमान १५ दिवस आधी त्यावर फवारणी करणे आवश्यक आहे. जर १५ दिवसांच्या आत ही फवारणी झाली, तर पिकाला कुठलाही धोका नाही. मात्र, तसे झाले नाही तर त्या रसायनांचा, विषारी द्रव्याचा हापूसवर नक्कीच मोठा विपरीत परिणाम होतो. हापूसवर केल्या जाणार्‍या ‘कल्टार’ आणि इतर रसायनांच्या फवारणीचा मनुष्यावरही निश्चित परिणाम होत असणार. जर आपण निसर्गावर विष फेकत असू, तर निसर्गही आपल्यावर विषच फेकणार, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘कल्टार’ची फवारणी केल्यानंतर कुठलेही झाड दोन ते तीन वर्षे हापूसचे चांगले उत्पादन देऊ शकते. मात्र, त्यानंतर रसायनांच्या अतिवापरामुळे त्या झाडाची वाढ होत नाही.

कोकणचे वातावरण फळांसाठी अनुकूल आहे. मात्र, आता हापूससोबतच काजूवरही मोहोर पडणे, अळ्या पडणे आणि इतर संकटे घोंघावू लागली आहेत. या स्थितीत कोकणच्या समृद्धीसाठी निसर्गाला पूरक असलेल्या कुठल्या व्यवस्था आपल्याला उभारता येऊ शकतील?

सध्या लागवड होत असलेल्या काजूंपेक्षा जर गावठी काजूची लागवड केली, तर त्यावर निसर्गाचा फारसा परिणाम होत नाही, असा माझा अभ्यास आहे. स्थानिक प्रजाती जर आपण लावल्या तर त्याला कुठलाही फटका बसत नाही. काही विशिष्ट प्रजातींची लागवड भरमसाठ पद्धतीने केल्यामुळे आणि एकप्रकारची पीकपद्धती रुजवल्याने काजूवर ही संकटे आली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गावठी काजूचे उत्पादन कमी असले तरी त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. नारळ, सुपार्‍या, कोकम, जांभूळ, करवंदे ही पिकेही कोकणात खूप मोठ्या प्रमाणात येतात. मागील ३० वर्षांच्या माझ्या अभ्यासात कोकणात करवंदाचे पीक आले नाही, असे एकही वर्ष मिळणार नाही. मात्र, या पिकांकडे दुर्लक्ष होते हे दुर्दैव आहे. उद्या जर करवंदांच्या पिकावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले, तर आज जी स्थिती हापूसच्या संदर्भात झाली, तीच उद्या करवंदांच्या बाबतीतही होऊ शकते. जर करवंदांचा वापर व्यावसायिकदृष्ट्या व्हायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली, तर त्यापासूनही अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्यातही कृत्रिमता आणि रासायनिक वापर करून त्याचेही हापूसप्रमाणे होऊ शकते. कोकमचेही असेच आहे. कोकमचा वापर सरबत, आमसूल, व्हॅसलिन, मेण, वंगण आणि अशा अनेक गोष्टींसाठी करता येऊ शकतो. मात्र, त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळेच हे बायप्रॉडक्ट्स दुर्लक्षित राहतात आणि सगळं लक्ष हापूस आंब्यांवर राहते, हे वास्तव आहे. कलमीकरणाच्या माध्यमातून घेतले जाणारे पीक कोकणसाठी आणि पिकासाठीही हानिकारकच आहे. त्यामुळे हापूसविषयी बोलायचे तर पूर्वीप्रमाणे कोकणातील हापूसचे चित्र निर्माण करायचे असेल, तर नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही रासायनिक विषारी द्रव्यांचा वापर न करता आणि जैवविविधतेला केंद्रस्थानी ठेऊन हापूसचे उत्पादन झाले तर कोकणसाठी, हापूस उत्पादकांसाठी आणि कोकणवासीयांसाठी खूप फायदेशीर होईल.

दिलीप कुलकर्णी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.