'वैभव'शाली 'प्रांगण'

    30-Apr-2023   
Total Views |
 
Vaibhav Patil
 
 
 
डोळखांबसारख्या परिसरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलविणार्‍या ‘प्रांगण’ संस्थेचे अध्यक्ष वैभव नरेंद्र पाटील यांच्याविषयी...
 
वैभव पाटील यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे वडील नरेंद्र पाटील हे ज्ञानसरिता ज्यु. महाविद्यालय भाल गुरूकुल, कल्याण येथे शाळा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. वैभव यांची आई माधुरी ही गृहिणी. पत्नी दीक्षा आणि बहीण सृष्टी या शिक्षिका. वैभव सध्या कनिष्ठ महाविद्यालयात ‘लेक्चरर’ म्हणून कार्यरत आहेत.
 
वैभव यांचे संपूर्ण कुटुंब हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत. त्यांचे शालेय शिक्षण जोंधळे विद्यालयात झाले. त्यांनी वाणिज्य शाखेची निवड केली. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जोंधळे कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. पदवीच्या प्रथम वर्षाला गेल्यानंतर त्यांनी सोमय्या महाविद्यालयाची निवड केली. 2008 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणाचे स्वप्न बाळगून सोमय्या महाविद्यालयात प्रवेश केला. थोड्याच दिवसात मात्र वैभव यांना वास्तवाचा फटका बसू लागला. स्थानिक माध्यमाच्या शाळेतून येण्याचे अनेक फायदे किंवा तोटे होते. तसेच, वैभव यांनादेखील इंग्रजी फारसे ठोस नसल्याने अभ्यास करताना कठीण जात होते. तसेच वैभव यांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्या त्यांच्याच मित्रांची खूप भीती वाटत होती. त्यांना इंग्रजी अत्यंत अस्खलित येत होते आणि वैभव मात्र धडपड करीत होता. वैभव यांना इंग्रजी फारसे चांगले येत नसल्याने त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील पहिले शैक्षणिक अपयश हे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने आले. पण, त्यावेळी ही हार मानण्याची वेळ नाही, असा विचार करून वैभव यांनी स्वत:ला सावरले. त्यानंतर लगेचच पुढील वर्षात सोमय्याच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’त वैभव यांना सामावून घेण्यात आले. तसेच, सामाजिक कार्याची बीजे ‘एनएसएस’मुळे रोवली गेल्याचे वैभव सांगतात. त्यामुळे आपल्या देशात तळागाळातील वास्तव किती कठोर आहे, हे जाणवल्याचे वैभव सांगतात.
 
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैभव यांनी त्यांचा मित्र आदेशसोबत ‘प्रौढ गर्व साक्षरता वर्ग’ सुरू केला. या प्रकल्पांतर्गत इंदिरानगर, डोंबिवली येथील वस्त्यांमध्ये राहणार्‍या घरांची ओळख करून घेतली आणि त्यांना साक्षर होण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. वैभव आणि त्यांच्या मित्रांनी या वस्तीतील लोकांना ‘नया सवेरा’ या संस्थेच्या माध्यमातून साक्षर करण्याच्या उद्देशाने मराठी शिकवायला सुरुवात केली. या ‘प्रौढ साक्षरता वर्गा’च्या माध्यमातून त्यांना आपले नाव वाचता येऊ लागले. मग हळूहळू बसमधील नावाच्या पाट्या वाचता आल्या. घरकाम करणार्‍या महिलाही त्यांच्या मुलांसह या वर्गात येऊ लागल्या ही गोष्ट खूपच प्रेरणादायी असल्याचे वैभव सांगतात. आठवड्यातून तीनदा वर्ग घेतले जात होते.
 
‘प्रौढ साक्षरता वर्ग’ चालू ठेवण्यासाठी एक घटना अशी घडली होती, त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमात एका घरातील एक व्यक्ती म्हणाली की, “ज्या व्यक्तीने आम्हाला लिहायला, वाचायला शिकविले, ते आमच्यासाठी फोटोमधल्या गुरूंपेक्षा खूप महत्त्वाचे आहेत.” त्या व्यक्तीचे हे शब्द ऐकून वैभव यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि याच क्षणी वैभव यांनी ‘बी.एड’ करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा निश्चय वैभवने घेतला होता. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अध्यापनातून केली. वैभव यांना प्रारंभी इंग्रजी भाषेमुळे शिक्षण घेताना न्यूनगंड निर्माण झाला होता. परंतु, नंतर वैभव यांना शिक्षण क्षेत्रत अनेक अभ्यासक्रम आणि पदवी मिळवण्याची प्रेरणा मिळाली. शिकण्याच्या आवडीपोटी त्यांनी सोमय्या विद्यापीठातून ‘बी.कॉम’, ‘एम.कॉम’, ‘बी.एड’, ‘पीजीडीएमई’ पूर्ण केले. वैभव सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहेत. वैभव ‘बी.एड’करीत असताना वनवासी शाळा आणि कमी उत्पन्न असलेल्या सरकारी शाळांच्या परिस्थितीबद्दल संवेदनशील होते.
 
संसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांचे शिक्षण थांबणार नाही, याची खात्री करण्यासाठी काही वनवासी शाळा ओळखल्या आणि त्यांच्यासाठी काही मूलभूत शालेय साहित्याची व्यवस्था केली. आजपर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचण्यात त्यांना शैक्षणिक संसाधन पुरवठा करण्यात ते यशस्वी झाले आहेत. गरिबांना साहित्य पुरविले, तर ते काही दिवस टिकेल. मात्र, त्यांना गरिबीच्यादुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ‘शिक्षण आणि साक्षरता’ या संकल्पनेची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. ‘प्रांगण’ संस्थेची संकल्पना त्यांना अन्न वाटप करताना सूचली. 2018 मध्ये त्यांनी ‘प्रांगण’ची स्थापना केली. ‘प्रांगण’ संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले. फक्त केंद्र, काही शिक्षक आणि मूठभर मुलांसह त्यांनी ‘प्रांगण’च्या कामाला सुरुवात केली. पण आता 100 शिक्षक आणि स्वयंसेवक आहेत. 74 मुले आहेत. संस्था सध्या शैक्षणिक समानतेच्या दिशेने पूल बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या कामाचा गौरव ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्कार देऊन केला आहे. तसेच, संस्थेला ‘एज्युकेशन एक्ससेलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. या कामात त्यांना अक्षय हंचाटे, राहुल देशपांडे, तन्मय मूलगुंड, चार्मी विच्छिवोरा, स्वप्निल सरफ रे, आशिष पुजारी, सागरिका अय्यर, हेतवी विच्छिवोरा याचे सहकार्य मिळत आहे. वैभवसारख्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.