गंगाजळीत उच्चांकी वाढ

    24-Apr-2023
Total Views | 127

Rupee  


 
 
भारताच्या विदेशी गंगाजळीत नऊ महिन्यांतील उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने दिलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली. डॉलर वरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्वच देश उपाययोजना राबवत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. मात्र, सेवा क्षेत्रातील निर्यात ही प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असल्याने तूर्त डॉलरला पर्याय नाही!
 
जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचे काही दिवसांपूर्वीच कौतुक झाले. त्याला साजेसे असे चित्र देशातही दिसून येत आहे. 14 तारखेला संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा अर्थात विदेशी गंगाजळी नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ती आता 586.41 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.


गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात 1.65 अब्ज डॉलर इतकी वाढ झाली, तर 7 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात 6.3 अब्ज डॉलरची वाढ नोंदवण्यात आली होती. ‘रिझर्व्ह बँके’च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, विदेशी चलन मालमत्ता शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात 4.74 अब्ज डॉलरने वाढून, 514.431 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. विदेशी चलन मालमत्तेमध्ये युरो, पाऊंड आणि येन यांसारख्या बिगर अमेरिकी चलनांमधील घट आणि वाढीचा परिणामदेखील समाविष्ट असतो. या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.496 अब्ज डॉलरने वाढून, 46.696 अब्ज डॉलर झाले आहे. तसेच, ‘स्पेशल ड्रॉईंग राईट्स’ 5.8 कोटी डॉलरने वाढले आहेत. ते आता 18.45 अब्ज डॉलर इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेवलेला चलन साठा 1.3 कोटी डॉलरने वाढला आहे.
 
देशांतर्गत पायाभूत सुविधांची होत असलेली कामे, नवनवीन प्रकल्पांचे होत असलेले भूमिपूजन तसेच उद्योगधंद्यातील वाढ याचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग जगात सर्वाधिक ठरला आहे. संपूर्ण जगावर मंदीचे सावट असताना, भारत करत असलेली प्रगती ही लक्षणीय अशीच आहे. अमेरिकेच्या वाढीचा दरही केवळ एक टक्का इतकाच आहे, तर युरोपाचा दर त्यापेक्षाही कमी नोंदविण्यात आला आहे. सेवा क्षेत्रात भारत करत असलेली निर्यात, ही विक्रमी ठरली आहे. तसेच, रशियाकडून जास्तीत जास्त कच्चे तेल सवलतीच्या दरात आयात करताना, ते स्थानिक चलनांमध्ये देशात आणले जात असल्याने, भारताच्या विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. भारत रशिया दरम्यान वाढत असलेला व्यापार, रशियाला होणारी वाढती निर्यात हीदेखील महत्त्वाची ठरली आहे. विदेशी गंगाजळीला महत्त्व अशा करता आहे की, स्थानिक चलनाचे जेव्हा अवमूल्यन होते, तेव्हा आपल्याकडे विदेशी चलनाचा साठा बाजारात आणून चलनाची पडझड थांबवता येथे.
 
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जेव्हा अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेने व्याज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात केलेली गुंतवणूक डॉलरमध्ये काढून घेतली. त्यावेळी अर्थातच गंगाजळी कमी झाली. रुपया मार खाऊ लागला. त्यावेळी ‘रिझर्व्ह बँके’ने हस्तक्षेप करत मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे असलेले अमेरिकी डॉलर बाजारामध्ये ओतले, म्हणूनच रुपयाला फारशी झळ बसली नाही. आजही ‘रिझर्व्ह बँक’ गरज भासल्यास, अशा उपायोजना करत असते. तसेच, ‘स्पॉट मार्केट’मध्ये डॉलरची खरेदीही करत असते. भारतातील सेवा क्षेत्र हे मुख्यतः ‘आयटी इंडस्ट्री’वर आधारभूत आहे. डॉलरची किंमत वधारली की, ‘आयटी’ कंपन्यांचे आर्थिक ताळेबंद जास्तीचा नफा दाखवतात, तर डॉलर घसरला की, हाच नफा कमी दिसतो. म्हणूनच डॉलरची किंमत स्थिर ठेवणे, हे सध्या तरी भारतीय अर्थव्यवस्थेला क्रमप्राप्त आहे. सध्या आयातीसाठी आपल्याला डॉलरची फारशी गरज भासत नसली, तरी निर्यातीतील समतोल राखण्यासाठी डॉलर काही प्रमाणात गरजेचा आहे.
 
म्हणूनच डॉलर वरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्थानिक चलनात व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, हे करताना चलन विनिमयाचा दर हा डॉलरमध्येच आजही नोंदला जातो, हे विसरून जाणार नाही. म्हणूनच ‘रिझर्व्ह बँक’ आवश्यक तितके अमेरिकी डॉलर खरेदी करते आणि गरज भासल्यास ते विकूनही टाकते. अर्थात, ही एवढी सगळी कसरत करून आज उच्चांकी विदेशी गंगाजळी देशाकडे आहे, याचाच अर्थ आपली आयात काही अंशी कमी झाली आहे आणि निर्यात वाढली आहे. सध्या भारतात विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.


अमेरिकी ‘अ‍ॅपल’ने आपला स्मार्टफोन निर्मितीचा प्रकल्प भारतात आणला आहे. येत्या काही काळात आयफोनची निर्यात भारतातून सुरू होईल. उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील निर्यात जेव्हा सर्वाधिक होईल, तेव्हा रुपया तर मजबूत होईलच, पण विदेशी गंगाजळीतही डॉलरमध्ये घसघशीत वाढ झालेली दिसून येईल. सेवा क्षेत्रात होत असलेली निर्यात ही प्रामुख्याने डॉलरमध्येच आहे. तसेच, पाश्चिमात्य देशातून जे भारतीय काम करतात, ते डॉलरमध्ये देशात पैसे पाठवतात, हेही लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच डॉलरच्या किमतीत समतोल राखण्याचे मोठे काम मध्यवर्ती बँकेला करावेच लागते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121