नाशिक : शहरातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर उभारण्यात आले. काही ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर केले गेले. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होत असली तरी अशास्त्रोक्त गतीरोधकांमुळेच अपघातही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ते पाहता महापालिका शहरात स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा नाही याबाबत फेरसर्वेक्षण करणार आहे.
शहरात सध्या चारशेच्या आसपास स्पीड ब्रेकर आहेत. रस्ता सुरक्षा समितीकडून शहरात स्पीड ब्रेकर उभारणीस मंजुरी दिली जाते. त्यात लोकप्रतिनिधी, महापालिका बांधकाम विभाग, आरटीओ, तंत्रनिकेतन, वाहतूक पोलीस व काही एनजीओंचा सहभाग असतो. या समितीकडे अपघात रोखण्यासाठी शहरातील अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते. पण स्पीड ब्रेकरची संख्या नियंत्रित असावी, अशीदेखील मागणी पुढे येत आहे. त्यामुळे मनपा बांधकाम विभाग रस्ता सुरक्षा समितीमार्फत कोठे स्पीड ब्रेकर असावेत, कोणत्या रस्त्यावर स्पीड ब्रेकरची गरज नाही याचे सर्वेक्षण करून सखोल अहवाल तयार केला जाईल.
रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल निर्माण करणे व विविध चौकांत, सिग्नल, रस्ता क्रॉसिंग, गतिरोधक असेल तेथे सफेद पट्टे मारणे, कॅट आय लावणे, फलक लावणे आदी उपाययोजना कराव्यात, ही मागणी केली जात आहे. लवकरच रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणार असून, त्यात वरील मुद्यांवर काम केले जाणार आहे.
टेबल स्पीड ब्रेकर साकारणार
शहरातील बहुतांश रस्त्यांवर रॅम्बलर पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत. त्यावरून मार्गक्रमण करताना अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नव्या सर्वेक्षणात अशा पद्धतीचे स्पीड ब्रेकरऐवजी स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर भर दिला जाणार आहे. या नव्या स्पीड टेबल स्पीड ब्रेकरवर दिव्यांग व्यक्ती देखील व्हीलचेअरवरून मार्गक्रमण करू शकतील.
मुंबई नाका येथे भुयारी मार्गाचा पर्याय
मुंबई नाका सर्कल येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग केला जाणार आहे. द्वारका सर्कलवर नॅशनल हायवेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर मिर्ची चौकातील अपघात स्थळे नाहीशी केली जाणार आहे.