नाशिक : शहरात गुरुवारी पहाटे एकाचवेळी १५पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरु असल्याने, या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
गुरुवारी पहाटे आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने छापे टाकले असून आयकरात तफावत असल्याचा ठपका अनेक बांधकाम व्यवसाययिकांवर ठेवण्यात आला आहे. शहरात महात्मा गांधी रोड, कुलकर्णी गार्डन यांसह विविध ठिकाणी असणार्या १५ पेक्षा अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले.
आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने ही कारवाई केली असून, आयकरात तफावत असल्याचे जाणवल्याने छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. यातील अनेक बांधकाम व्यावसायिक नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांशी संबंधित असल्याने या कारवाईनंतर औद्योगिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छाप्यांमध्ये शहरातील नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. छाप्यामध्ये सर्व अधिकारी नाशिक, छ. संभाजीनगर, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.
शहरातील नामांकित बिल्डर लक्ष
शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी केली.