१३२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महामानवास अभिवादन
14-Apr-2023
Total Views | 53
14
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन महामानवास अभिवादन केले.
यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान (पवित्र वस्त्र) देण्यात आले.
यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर, सभापती, बौद्धजन पंचायत समिती आनंदराज आंबेडकर, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उज्वल निकम, भदंत डॉ राहुल बोधी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुंबई दर्शन प्रमाणे 'डॉ आंबेडकर सर्किट' पाहण्यासाठी बससेवा सुरु करावी : राज्यपाल रमेश बैस
महाराष्ट्र व विशेषतः मुंबई ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती. या शहरात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले, पक्षकार्य केले तसेच निवडणूक देखील लढवली. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा या शहरात आहे. ही स्थळे सर्वांना पाहता यावी याकरिता मुंबई दर्शन बससेवेप्रमाणे 'डॉ आंबेडकर सर्किट दर्शन' अशी बससेवा सुरु करण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी झालेल्या सभेत केली.
इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ सिद्ध होईल असे राज्यपालांनी सांगितले.
इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे स्मारक निर्माण होईल: मुख्यमंत्री
आज भारत जगात सशक्त लोकशाही देश म्हणून उभा आहे, याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना 'बार्टी' च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे शासनाने ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे स्मारक निर्माण होत असल्याचे सांगून स्मारकासंदर्भात प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन स्मारकातील त्रुटी दूर करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ आंबेडकर यांचे कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे असे. जगाच्या इतिहासात समाज उत्थानासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे असे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे याचे कारण डॉ आंबेडकर यांनी दिलेले संविधान असल्याचे त्यांनी सांगितले.
'द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी' हे पुस्तक १०० वर्षांपूर्वी लिहून डॉ.आंबेडकर यांनी देशाला काळ्या पैशाच्या समस्येतून बाहेर कसे काढता येईल याचे विवेचन केले होते, त्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे फडणवीस यांनी सांगितले. डॉ.आंबेडकर यांच्या मार्गाने चालल्यास भारत जगातील सर्वोत्तम देश म्हणून उदयास येईल असे त्यांनी सांगितले.