
पुणे महानगराचा विस्तार होत असताना प्रगती नको असलेल्या प्रवृत्तीदेखील डोके वर काढताना वारंवार दिसतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समूळ नष्ट करणे यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याची नितांत आवश्यकता आहे. अलीकडील काळात पुणे आणि नजीकच्या परिसरात या विघातक प्रवृत्ती डोके वर काढीत असल्याचे दिसून आले.
जुलै महिन्यात ‘टेरर फंडिंग’ प्रकरणात येथील कोंढवा परिसरातून पकडलेल्या तरुणाचेथेट काश्मिरात अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी लोकांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. कोरेगाव-भीमा प्रकरणातील गौतम नवलखा याचे तर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या एजंटसोबत संबंध असल्याचे तपास करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितल्याने, पुणे शहरात जे विद्येचे माहेरघर म्हणून आणि संस्कृतीचे मंदिर म्हणून ओळखले जाते, तेथील नागरिकांनी आणि त्यांचे रक्षण करणार्या यंत्रणांनी सतर्क राहण्याची वेळ आली आहे.
ही दोन उदाहरणे गंभीर आहेत, इतर अशा विघातक छोट्या प्रवृत्तीदेखील डोके वर काढीत असतात. त्यामुळे सावध असणे केव्हाही श्रेयस्कर. त्यात परवाच उत्तर प्रदेशात चकमकीत ठार झालेल्या असद अहमद या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीचेदेखील‘पुणे कनेक्शन’ समोर आले आहे. आजकाल आपल्या समाजातील काही लोक अशा प्रवृत्तींना पाठीशी घालीत असल्याने त्यांनादेखील थारा देता कामा नये. कारण, असदच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात त्याचे समर्थन करणार्यांचे चेहरे पुढे आले आहेत. आपल्या भागातदेखील पुरोगामी असण्याच्या नावावर असे लोक या प्रवृत्तीला पाठीशी घालीत असतात, हे वेगळे सांगायला नको.
गुन्हेगारी वाढीस लागण्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, समाजात फोफावणारी ही गुन्हेगारी जेव्हा देशविरोधी कृत्यांपर्यंत जाऊन पोहोचते, तेव्हा त्यास प्रतिबंध करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. त्यामुळे तपास यंत्रणांनादेखील चालना मिळते. त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग होता कामा नयेत. पुण्यातील अशा कारवायांवर लक्ष ठेवणे. त्याबाबत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपल्या भागातील तरुण जर अशा देशविरोधी आणि गुन्हेगारी कारवायांकडे वळत असतील, तर त्यांना योग्य दिशा देण्याचे काम समाजाचे आहे.
आता उन्हाळा सुरू झाला की, शीतपेयांच्या जाहिराती अधिक प्रकर्षाने जागोजागी झळकताना दिसतात. आजकाल तर हातातील मोबाईलदेखील सहज एखाद्या पोस्टवर बोट फिरवतो म्हटले तरी जाहिरात येत असते. मात्र, या जाहिराती आपल्या देशातील तरुण पिढीला भरकटत नेत असतील, तर नक्कीच त्यावर प्रतिबंध असायला हवा. सुदैवाने केंद्रातील सरकारने अलीकडेच ज्या आजकाल जुगार संबंधित पोस्ट ‘व्हायरल’ होत आहेत, त्याबाबत मार्गदर्शक तत्वे आखून देताना कठोर नियमदेखील जारी केले आहेत. आपल्या देशात लोकांना दिशाभूल करून कसे लुटायचे, याचे षड्यंत्र काही विदेशी कंपन्यांच्या साहाय्याने रचले जात असते. आता उन्हाळ्यात ज्या शीतपेयांचा भडिमार केला जातो, त्यातून आरोग्यास अपायकारक घटक त्यात असल्याचे निदर्शनास येत आहे.
अवघ्या २० रुपयांत जागोजागी मिळणार्या एका शीतपेयात तर चक्क कॅफेनचे प्रमाण त्यात असल्याचे नमूद आहे. एवढेच नव्हे, तर या प्रत्येक १०० मिलीच्या बाटलीत २९ मिली ग्रॅम कॅफेन आहे, २५० मिलीच्या बाटलीत ७५ मिलीपेक्षा कॅफेन घेऊ नये, अशी नोंददेखील आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या मते, १०० मिली ग्रॅमपेक्षा अधिक कॅफेन जर आपल्या शरीरात गेले, तर मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होत असतात. अशा पेयांवर खरे तर बंदी हवी. विक्रेत्यांनी स्वतःहून ती विकू नयेत. किमान समाजाने, विशेषतः पालकांनी तरी याबाबत आपल्या मुलांना अशा नशा उत्पन्न करणार्या पेयांपासून सावध तर करायलाच हवे.
शहरी आणि ग्रामीण भागात आजकाल या पेयांचे पेव आले आहे. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सक्रिय होतील तेव्हा होतील मात्र प्रत्येक घरातून या शीतपेयांपेक्षा उत्तम सकस आणि पौष्टिक असे पेय निर्माण करून दिले, तर मुले या शीतपेयांच्या आहारी जाणार नाहीत. कारण, ही २० रुपयांची नशा नाश करण्यास पुरेशी आहे, हे सर्वांनी ओळखले पाहिजे, अन्यथा त्याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम जीवावर बेतू शकतात.
अतुल तांदळीकर