भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत वेगळे सांगणे नकोच. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या देशात दोनवेळचे जगणेही मुश्किल. या देशाशी सध्या भारताचा व्यापारही नाही आणि परराष्ट्र संबंधही फिस्कटलेले. त्यामुळे सरकारी पातळीवर संवादाचा सेतू असा हा पूर्णत: कोलमडलेलाच. पण, अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधला डिजिटल संवाद मात्र वाढलेला दिसतो. हा संवाद सरकारी पातळीवर, अधिकारी स्तरावर नाही की कुठल्या परिषदा नाहीत, हा थेट संवाद आहे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा...
खरंतर पाकिस्तानात भारताविषयी आणि भारतातही पाकिस्तानविषयी वर्षानुवर्षे पेरलेले समज-गैरसमज आजही कायम आहेत. त्यातच दोन्ही देशांमधील माध्यमे एकमेकांविषयी जे चित्र उभे करतात, त्यावर जनताही पर्याय नसल्याने आंधळेपणाने विश्वास ठेवते. पण, आजचा जमाना हा सोशल मीडियाचा. आपल्याकडेही जसे सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स, सेलिब्रिटी आकारास आले, तितकीच पाकिस्तानातही त्यांची चलती. अशाच काही पाकिस्तानातील सोशल मीडियावर मोठे फॅनफॉलोईंग असलेल्या युट्यूबर्स आणि कंटेट क्रिएटर्सनी, भारताविषयी पाकिस्तानींना काय वाटते, याबाबत शेकडो व्हिडिओ तयार करून त्यांचा कौल घेतला. बरे-वाईट जी काही उत्तरं असतील, ती प्रसारित केली आणि यानिमित्ताने का होईना, पाकिस्तानी जनमानसात भारतीयांविषयीचे पेरले गेलेले शेकडो विचित्र गैरसमज समोर आले.
शोहेब चौधरीसारखे काही पाकिस्तानी युट्यूबर्स तर भारताविषयीचे हे गैरसमज पाकिस्तानी नागरिकांना तथ्यासह कसे फोल आहेत, हे पटवून देण्याचादेखील प्रयत्न करताना दिसतात. पण, एखाद्याच्या मनावर-मेंदूवर कोरलेले इतके सहजासहजी पुसणेही शक्य नाहीच. त्यातच शोहेब चौधरी असेल किंवा सना अमजद, या पाकी युट्यूबर्सवर ते भारतप्रेमी असल्याची सडकून टीकाही झाली. पण, ‘आम्हालाही मोदीच पंतप्रधान म्हणून हवे’, ’फाळणी झालीच नसती, तर आपण सुखी असतो’ अशा काही पाकिस्तानींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया भारतातही प्रचंड ‘व्हायरल’ झाल्या आणि इतक्या प्रामाणिकपणे मत मांडणार्या पाकिस्तानींचे भारतीय नेटकर्यांनीही कौतुकच केले.
परंतु, केवळ अशा पाकिस्तानींच्या प्रतिक्रिया घेणे पुरेसे नाही, तर त्यांच्या मनातील भारतीय समाजाविषयी, मुसलमानांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी थेट संवाद घडवून आणणेही तितकेच गरजेचे. आता प्रत्यक्षात जरी ते शक्य नसले तरी ‘डिजिटल’ माध्यमातून हा प्रयोग सुरू झाला. आश्चर्य म्हणजे, अल्पावधीत हा प्रयोग पाकिस्तानसह भारतातही तितकाच गाजला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाकिस्तानी युट्यूबर्स भारतीयांशी थेट संवाद साधतात. तसेच त्यांच्या सोबत इतर पाकिस्तानींनाही भारतीयांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देतात. अशा या जनसंवादाच्या प्रयोगामुळे भारतीय मुसलमानांवर हिंदूंकडून अत्याचार केला जातो, भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधात आहे यांसारखे पाकिस्तानी आवामच्या मनात तिथल्या सरकारने, माध्यमांनी पेरलेले कित्येक गैरसमज हळूहळू का होईना दूर होताना दिसतात. जेव्हा ही पाकिस्तानी मंडळी भारतीय मुसलमानांच्या तोंडूनच त्यांच्या चांगभल्याविषयी ऐकते, प्रत्यक्ष बाजारांचा, शहरांचा असा ‘डिजिटल ’फेरफटका मारते. तेव्हा, या पाकिस्तानींना आपल्याला इथे कसे मूर्ख बनविले गेले, यामागील फोलपणा लक्षात येतो.
असे शेकडो व्हिडिओ आज भारत आणि पाकिस्तानमधील सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत असून, त्यांनी एकमेकांबद्दलचे पूर्वग्रहदूषित विचार काही प्रमाणात मोडीत काढण्यास प्रारंभ केलेला दिसतो. त्यामुळे परवा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना म्हणाल्या तसे- “भारतीय मुस्लिमांची स्थिती बघायची असेल, तर त्यासाठी इथे बसून लिहू नका, प्रत्यक्ष भारतात या.” त्याचीच प्रचिती अशा भारत-पाक ‘डिजिटल’ जनसंवादातून निर्माण होताना दिसते. तेव्हा, दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील किंवा बिघडतीलही, ते जनतेच्या हातात नक्कीच नाही. त्यातच अशा व्हिडिओंच्या मागे पाकी गुप्तहेर संघटनांचा हात असण्याची शक्यता कमी. कारण, पाकी जनता थेट सैन्य-‘आयएसआय’वरील रागही व्हिडिओतून उघडउघड व्यक्त करते. त्यामुळे एकमेकांविषयीचे गैरसमज, कटुता दूर करून डिजिटली का होईना, ‘अमन की आशा’ची किरणे दिसू शकतात, हेही नसे थोडके!