सागरीविश्वात रममाण अवलिया...

    12-Apr-2023   
Total Views |
Dr. Vardhan Patankar

सागरी जैवविविधतेवर निस्सीम प्रेम करणार्‍या आणि त्या जैवविविधतेच्या शास्त्रीय अभ्यासातून संवर्धनासाठी कार्यरत डॉ. वर्धन पाटणकर यांचा जलमय प्रवास...

सागरी जैवविविधतेवर निरामय प्रेम करणार्‍या डॉ. वर्धन पाटणकर यांचा जन्म मुंबईतलाच. लहानपणापासूनच म्हणजे अगदी वयाच्या तिसर्‍या वर्षापासून वर्धन यांना पोहण्याची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील जहाजे आणि बोटी दुरुस्त करण्याचे काम करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच समुद्राशी अगदी जवळचा संपर्क आल्यामुळे पाण्याची भीती सोडाच, उलट वर्धन यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. शालेय वयापासून ते जलतरणाच्या विविध स्पर्धांमध्ये आवर्जून सहभाग घेत. या स्पर्धांमध्ये ‘सी स्विमींग’ स्पर्धांचाही समावेश होता. कुलाबा-नेव्ही नगरपासून सुरू झालेल्या स्पर्धेत दहा किलोमीटर अंतरापर्यंत पोहणे अपेक्षित.

त्यामुळे सागरीविश्वाचे विशेष आकर्षण निर्माण झाले. या आकर्षणातूनच पुढे आपण ‘स्कूबा डायव्हिंग’ करावे, अशी वर्धन यांची इच्छा होती. पण, पोहताना सागराखालच्या गूढ विश्वाने, जैवविविधतेने त्यांच्या मनात औत्सुक्य आणि कुतूहल निर्माण केले आणि पुढे त्यांच्या प्रवासाला एक वेगळेच वळण मिळाले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी ‘झुओलॉजी’ म्हणजेच ‘प्राणिशास्त्र’ या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांना डॉ. नंदिनी देशमुख यांच्याबरोबरच इतर प्राध्यापकांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. पदवीनंतर पुढे ‘मरिन बायोलॉजी’ विषयात ‘मास्टर्स’ करण्याचे त्यांनी ठरवले. २००३ मध्ये गोवा येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथेच पुढे गोवा विद्यापीठातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेत संशोधक आणि अभ्यासकांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या कामामुळे कामाची दिशा सापडण्याबरोबरच नेमके काय काम करावे आणि ते कशा पद्धतीने करावे, हे समजले, असे ते सांगतात. पुढे पदव्युत्तर शिक्षण सुरु असतानाच २००४ मध्ये अंदमान-निकोबार बेटांवर कामानिमित्त भेट देण्याची संधी चालून आली.

दि. २६ डिसेंबर, २००४ मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर आलेल्या त्सुनामीचे गंभीर परिणाम निसर्गावर तसेच जनजीवनावर झाले होते. या काळात त्सुनामीपासून समुद्रकिनार्‍यांचे संरक्षण करणार्‍या कांदळवने आणि प्रवाळांचा नेमका कसा फायदा झाला, याविषयी काहीही अभ्यास उपलब्ध नव्हता. तो अभ्यास करणार्‍या मंडळींच्या चमूमध्ये वर्धन यांचा समावेश होता. कारण, कोणत्याही ‘मास्टर्स’ करणार्‍या विद्यार्थ्यांचे अशाप्रकारच्या बेटांवर जाऊन काम करण्याचे स्वप्न असते. त्यामुळेच वर्धन यांच्यासाठी चालून आलेली ही सुवर्णसंधी होती. आपल्या कल्पनेपल्याड असलेल्या अंदमानच्या नैसर्गिक सौंदर्याची वर्धन अगदी तोंडभरून स्तुती करतात. २००८ साली निकोबारमध्येच त्यांनी पीएच.डीसाठी नोंदणी करुन अभ्यास सुरु केला.

त्यांनी ‘कॉन्झर्वेशन बायोलॉजी’ आणि ‘कोरल रीफ इकोलॉजी’ या विषयातील पीएच.डी २०१३ साली पूर्ण केली. यादरम्यान ‘डीएसटी’ म्हणजेच ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’ यांच्याकडून ’इन्स्पायर’ या नावाची फेलोशिपही त्यांना मिळाली. २००५ पासून २०१८ पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवरच या सगळ्याविषयी त्यांचे अविरत काम सुरु होते. नंतर अंदमानमधून परतल्यानंतरही वर्धन यांनी अभ्यास आणि कामाचा धडाका मात्र कायम ठेवला. २०२० साली ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी’ या संस्थेच्या ‘मरिन प्रोग्रॅम’चे नेतृत्व करण्याची संधी वर्धन यांना मिळाली.

याव्यतिरिक्त लक्षद्वीप बेटांनजीकच्या प्रवाळावरही वर्धन यांनी संशोधन केले. तसेच मालवणमधील डॉल्फिन्सवर त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या कामात ही त्यांचा सहभाग होता. बर्‍याच ’इंडियन कोस्टलाईन’मध्ये ‘स्कूबा डायव्हिंग’चा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. त्याचबरोबर कर्नाटकातील ‘नेत्रानी’ आणि गोव्यातील ‘ग्रॅण्ड’ या बेटांवर त्यांनी जैवसंवर्धन मोहीमही राबविली. तसेच मालवण किनारपट्टीपासून १३५ किमी अंतरावरील ‘आंग्रीया बँक’ येथेही जैवसंवर्धन मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

२००५ पासून म्हणजेच गेली १८ वर्षे सागरी तसेच इतर जैवविविधतेसाठी भरीव कामगिरी करणारे डॉ. वर्धन पाटणकर सध्या १८ देशांमध्ये कार्यरत असणार्‍या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत ‘कॉन्झर्वेशन डायरेक्टर’ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भारतीय किनारपट्टीवर ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’बरोबर त्यांचे काम सुरू असून मालवण आणि गोव्यामध्ये याच कामासाठी येणार्‍या तरुण संशोधक, अभ्यासकांसाठी मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.

पाण्यातील जैवविविधतेवर दांडगा शास्त्रीय अभ्यास असलेले डॉ. वर्धन, ‘’विकासकामांच्या मी विरोधात नाही. पण, विकासकामे करताना सागरी जैवविविधतेलाच काय, इतर कोणत्याही प्रकारच्या जैवविविधतेला धक्का लागणार नाही, याची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. तसेच, कारखान्यांतून येणारे व प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात किंवा इतर जलस्रोतांमध्ये सोडल्यामुळे फक्त मासे किंवा जलचरांवरच त्याचा परिणाम होत नाही, तर मानवावरही होतो. त्यामुळे त्याचीही काळजी घ्यायला हवी,” असे ते आवर्जून सांगतात.

“निसर्ग, इतर जैवविविधता आणि मानव यांचे चक्र परस्परांवर अवलंबून आहे, म्हणूनच निसर्गाची हानी होताना आपण स्वतःचेही नुकसान करत असतो, हे ध्यानी घ्यायला हवे. त्यामुळेच निसर्गातील इतर घटकांचा त्रास कमीत कमी कसा करता येईल, याचा विचार करायला हवा,” असा मोलाचा संदेश डॉ. वर्धन देतात. त्यांच्या या भरीव कामगिरीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.