मुंबई : देशासह राज्यातही पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही नंबर येत असल्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १,८५० आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ३० खाटा आहेत. पालिकेने म्हणटले आहे की, जेव्हा-जेव्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल.
खबरदारीचा उपाय म्हणून हा पर्याय मुंबई पालिकेने अवंलबलेला आहे. तसेच कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील. मुंबईत कोविड रुग्ण संख्या आतापर्यत ५०० पेक्षा अधिक झाली आहे. सध्या ४३ रुग्णावर उपचार सुरू असून २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H३N२ इन्फ्लूएंझाचा ही धोका वाढला आहे.त्यामुळे कोरोना आणि H३N२ च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.