मुंबई : ”लोकमान्य सेवासंघ मागील 100 वर्षांपासून अविरतपणे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. सेवासंघाच्या पदाधिकार्यांसह पार्लेकरांनी इथे कलादालन व्हावे, अशी मागणी केली असून येत्या काळात पार्ल्यात लवकरच कलादालनाची स्थापना केली जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हिंदू नववर्ष पाडव्याच्या औचित्यावर विलेपार्ले येथे आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. मुंबईतील सांस्कृतिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या लोकमान्य सेवा संघाच्या शतकपूर्ती निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यावेळी फडणवीसांनी सेवासंघाच्या कार्याचे कौतुक केले. ”बदलत्या काळानुसार जगाच्या बरोबरीने मुंबईसह पार्लेदेखील आधुनिक होत होते. मात्र, आधुनिकतेची कास धरताना पार्लेकरांनी आपली मराठमोळी भारतीय सनातन संस्कृती सोडली नाही. पुराण आणि वेदांमध्ये नमूद करण्यात आलेली संस्कृती जोपासण्याचे काम पार्लेकरांनी केलेले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानीच आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत.
या कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार पराग अळवणी, माजी मंत्री दीपक सावंत आदि उपस्थित होते.