राऊतसाहेब! आदित्य, उद्धव ठाकरेही विधीमंडळात मग त्यांना काय म्हणायचं?
फडणवीसांनी संजय राऊतांचा घेतला समाचार
01-Mar-2023
Total Views | 87
70
मुंबई : विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानंतर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सर्वपक्षिय टीका होत असून, त्यांच्या विरोधात हक्कभगाची कारवाई करण्यात येत आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सारवासारव करत म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केले.
विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केले होते. खरे तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवले, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत, अशीही सारवासारव राऊत यांनी केली.
मग उद्धव ठाकरेही चोरमंडळाचे सदस्य
विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखे नाही. हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वचचोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित करत संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
फडणवीस पुढे म्हणाले, विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचे विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असे विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचे समर्थन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.