आध्यात्मिक वारसा जपणार्‍या उषा

    05-Feb-2023   
Total Views |
 
Usha Kalamkar
 
लहानपणापासूनच आध्यात्मिक वारसा लाभलेल्या उषा कळमकर यांनी ‘सुबोध चिन्मय दासबोध मंडळा’ची स्थापना केली. महिलांनी स्वतंत्रपणे समर्थाच्या विचारांचे चिंतन, मनन करावे म्हणून त्या नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या अनेक शिष्या आता दासबोधावर व्याख्याने देऊ लागल्या आहेत. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत...
 
पूर्वाश्रमीच्या उषा काळे यांचा जन्म नाशिकमध्ये 1952 साली एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ होते. त्यांच्या वडिलांना ‘आनंद वन संस्थान’ धुळे येथील सद्गुरू केशवराव महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. वर्षातून दोन ते तीन महिने सद्गुरू त्यांच्या घरी वास्तव्यास असत. नाशिकमध्ये आलेल्या अनेक संतांचे पाद्यपूजन त्यांच्या घरी होत असे. उषा यांच्या आई या सुविचारी आणि धार्मिक होत्या. त्यांचे आई-वडील हे नियमित भागवत वाचन करीत असत. त्यामुळे उषा यांना देखील लहानपणापासूनच आध्यात्मिक वारसा लाभलेला होता. त्यांना लहानपणीच प. पू श्रीधर स्वामी, पू. कलावती आई, ह.भ.प. धुंडी महाराज देगुलरकर यांचे दर्शन झाले. त्यांच्या आजोबांना प. पू गोविंद महाराज यांनी दीक्षा दिली होती. म्हणूनच “जेणो परमार्थ ओळखिला तेणो जन्म सार्थक केला” या वचनाप्रमाणे त्यांची जडणघडण अत्यंत पवित्र आणि अध्यात्मिक वातावरणात झाली.
 
उषा यांनी ‘एम.बीएड’पर्यंतचे शिक्षण नाशिक येथून पूर्ण केले आहे. त्यांना वसंत कानेटकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले आहेत. अनेक साहित्यिकांचा सहवास ही त्यांना मिळाला. त्यामुळेच मराठी विषयाची आणि वाचनाची आवड निर्माण झाल्याची प्राजंळ कबूली त्या देतात. डी. व्ही पलूसकरांच्या नातसूनेकडे त्यांनी गायन आणि वादनाचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासह त्यांच्या भावंडांनी ही गायन आणि वादनाचे धडे उषा यांच्यासोबतच गिरविले. उषा या विवाहानंतर डोंबिवलीकर झाल्या. उषा यांचा स्वभाव हा अत्यंत शिस्तप्रिय असा होता. त्यांच्या स्वाभावामुळेच त्यांनी सासरी सर्वांना आपलेसे केले. एवढेच नाही, तर सर्व नातेवाईकाप्रति असलेल्या जबाबदार्‍यादेखील त्यांनी व्यवस्थित पार पडल्या. उषा यांनी ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यालय ठाणे येथे अध्यापनाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध, वक्तृत्व, समूहगान अशा अनेक स्पर्धेत मुलांनी बाजी मारत पारितोषिके पटकाविली. सेवेत असताना त्यांनी सहकारी आणि विद्यार्थ्यांना खूप मदत केली. त्यांची अध्यापनाची पद्धत, त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेतमिळविलेले यश आणि त्यांची मदत करण्याचा स्वभाव यामुळे यशाचे एक एक शिखर त्या पार करत गेल्या. त्यांनी पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशा विविध पदांवर बढती मिळविली आहे. 33 वर्षांच्या सेवेनंतर त्या मुख्याध्यापक या पदांवरून सेवानिवृत्त झाल्या. शाळेचा सुवर्ण महोत्सवदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाला.
 
उषा यांची मराठी आणि भूगोल या विषयावरील तीन पुस्तके प्रकाशितदेखील झाली आहेत. त्यांनी विद्यार्त्यांना संगीत सेवेत पूरक अशा काही पुस्तकांचे लिखाण केले आहे.
 
याशिवाय त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या विविध सामाजिक संस्थांशीदेखील जोडलेल्या आहेत. सामाजिक कर्तव्यदेखील त्यांनी जबाबदारीने पार पडले आहे. शिवथर घळीतील समर्थ विद्यापीठाचे 11 वर्ष वर्ग घेतले आहेत. ‘जनकल्याण समिती’तर्फे चालणार्‍या उपक्रमात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. कीर्तन महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले आहे. ‘समर्थ सेवा मंडळ’ सातारा या संस्थेचे काम ही त्यांनी केले आहे. ‘सुबोध चिन्मय दासबोध मंडळां’ची डोंबिवलीत स्थापना केली. आठवड्यातून एक दिवस सर्व भगिनी त्यांच्या घरी जमतात आणि दासबोधाचे अभ्यासपूर्ण वाचन केले जाते. भगिनींनी स्वतंत्रपणो समर्थाच्या विचारांचे चिंतन, मनन करावे म्हणून प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्या अनेक शिष्या दासबोधाच्या परीक्षा देऊन त्यावर व्याख्याने ही देऊ लागल्या आहेत. उषा यांच्या वर्गांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांना दुसरा दासबोध वर्ग सुरू करावा लागला. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून घरोघरी भजन, गीतापठण, विष्णू सहस्रनाम, सप्तशतीचे पाठ, श्रीसुक्त इत्यादी कार्यक्रम पार पडतात. मंडळाच्या तपपूर्तीनंतर श्री समर्थ पद संग्रहाचा विशेषांक प्रकाशित झाला. कोरोना काळात वर्ग बंद होते. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून उषा यांनी त्या काळात समर्थ शिष्या ‘आका स्वामी’ यांचे चरित्र प्रकाशित केले. अजूनही दोन पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ही सर्व समर्थाची कृपा असल्याचे उषा सांगतात. पुढील काळात ऑनलाईन अभ्यास वर्ग घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्या सांगतात.
 
‘रोटरी क्लब’, ‘देशस्थ ब्राह्मण संघ’ डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिका यांनी त्यांना ‘आदर्श शिक्षक’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे, अशा हरहुन्नर व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.