शिंदेगटात जाण्यासाठी शंभर फोन! गौप्यस्फोट केल्यावर जाधव बिथरले!
28-Feb-2023
Total Views | 154
26
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला आहे. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आलं नाही असंही ते म्हणाले.
मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला आणि २२ जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील होण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, "कालच मी एक विधान केलं होतं की, या महाराष्ट्रातील सभ्यतेचं राजकारण, सुसंस्कृतपणाचं राजकारण, एकमेकांप्रती आदरभाव राखून राजकारण केलं पाहिजे. व्यक्तिगत कुणाच्या मुलाबाळांबद्दल, व्यक्तिगत कुणाच्या चारित्र्याबद्दल, वैयक्तिक कुणाच्या कुटुंबाबद्दल कुणीही बोलता कामा नये. मी माझ्या आयुष्यात हे तत्व पाळलं आहे."
"जोपर्यंत माझ्यावर कुणी टीका करत नाही, तोपर्यंत मी समोरच्या माणसावर टीका करत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. त्यांनी थोडं मागे वळून पाहिलं पाहिजे की, माझ्याकडून कळत न कळत चुका झाल्यात का याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. मोहित कंबोज यांनी माझ्यावर आरोप केला आहे." असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
"मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी समोर बघितलेली नाही. पण, संपूर्ण चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतोय की, यातील एक तरी आरोप हा मोहित कंबोजसारखा हरामखोर माणूस... तो जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा", असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलं.
यावर आता कंबोज यांनी भास्कर जाधवांवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, " जीभेवर नियंत्रण नसते पण ठेवाव लागत भास्कर जाधवजी. आताचा माझा व्हीडीओ सेव्ह करून ठेवा, २०२४ वर्ष महाराष्ट्रातील जनता दाखवेल पाळलेल कोण आहे." भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट काल कंबोज यांनी केला. त्याला उत्तर देताना भास्कर जाधव खालच्या भाषेत कंबोज यावर टीका केली यावरून आता कंबोज यांनी पुन्हा भास्कर जाधव यांना आव्हान दिल आहे.