देवनागरी
देवनागरी ही महाराष्ट्र शासनाद्वारे मराठी भाषेसाठी अधिकृतरीत्या स्वीकारली गेलेली लिपी आहे. मराठीसह हिन्दी, कोंकणी, बड़ो (बोडो), नेपाली (नेपाळी) ह्यांसारख्या अनुसूचित भाषांसाठी; संस्कृत, प्राकृत, पालीसारख्या प्राचीन भाषांसाठी व अन्य अनेक प्रचलित भाषांसाठी देवनागरी वापरली जाते. देवनागरीसाठीच्या युनिकोड-तक्त्यात या लिपीतील सर्व पायाभूत चिन्हे पाहता येतील [१].
या लिपीतील प्रत्येक अक्षर हे तत्त्वतः स्वरयुक्त असते. उदा. ‘कु=क्+उ’. कोणतेही स्वरांशचिन्ह नसणारे चिन्ह, ‘अ’ हा स्वर निर्देशित करते, उदा. ‘क=क्+अ’, परंतु लिखित मराठीच्या वाचनात याकरिता अपवाद आढळतात. उदा. ‘पडवळ’ या शब्दात चार चिन्हे आहेत, परंतु ‘प’ व ‘व’ या दोन चिन्हांनी निर्देशित अक्षरे स्वरयुक्त आहेत आणि ‘ड’ व ‘ळ’ या दोन चिन्हांनी निर्देशित अक्षरे स्वररहित आहेत. मराठीत एखाद्या व्यंजनासह स्वराचे असणे अथवा नसणे हे बहुतांश वेळा त्याच्या शब्दातील स्थानावरून ठरते अथवा काही वेळा रूढीवरून ठरते. उदा. ‘करवत’, ‘सरबत’ हे शब्द ‘पडवळ’ या शब्दाप्रमाणेच उच्चारले जातात, परंतु ‘नवरस’ या शब्दातील ‘व’ रूढीमुळे स्वरयुक्त आहे.
मराठीच्या लिपिव्यवहारात ‘च’, ‘ज’ व ‘झ’ या चिन्हांचे एकाहून अनेक उच्चार आढळतात. उदा. ‘चंद्र’ या शब्दातील ‘च’ तालव्य आहे, परंतु ‘चोर’ या शब्दातील दन्त्य/दन्तमूलीय, तसेच ‘जग’ या शब्दातील ‘ज’ तालव्य व ‘जवळ’मधील दन्तमूलीय. यासाठी काही आकृतिबंध आपल्याला सापडतात, उदा. इ व ए या स्वरांपूर्वी बहुतांश वेळा तालव्य उच्चार येतात असे म्हणता येते. हे केवळ ‘च’ वर्गापुरतेच मर्यादित नाही. पिसा हे विशेषण स्त्रीलिंगी नामासमोर वापरायचे झाल्यास त्याचे रूपांतर ‘पिशी’ असे होते. ‘स’ व ‘श’मध्ये दन्त्य व तालव्य हाच भेद आहे. जसे ‘इ’ व ‘ए’ बाबत आपण पाहिले तसेच हे ‘उ’ व ‘ओ’करिताही लागू आहे. या स्वरांपूर्वी बहुतांश वेळा दन्त्य उच्चार येतात. उदा. चुरा, चोर वगैरे, परंतु हेदेखील निरपवाद नाही. काही शब्द अन्य भाषांमधून मराठीत जसेच्या तसे आलेले दिसतात, उदा. चूर्ण (चुरा, संस्कृत), चोक (तुंबणे, इंग्रजी) वगैरे.
मराठीसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरीत ‘ल’ व ‘श’ या अक्षरांची दोन मराठीविशिष्ट वळणे आढळतात. मराठीविशिष्ट अशासाठी की सद्यस्थितीत ही वळणे हिन्दी समाजात वापरली जात नाहीत. पूर्वी ही वळणे दोन्ही लिप्यांमध्ये होती की नव्हती याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही असे दिसते. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने २०२२/११/१० रोजी घेतलेल्या शासननिर्णयात या वळणांच्या मराठीविशिष्टतेची पुष्टी केली आहे [२], परंतु दुर्दैवाने या शासननिर्णयाच्या अंमलबजावणीला २०२३/०१/०२ रोजीच्या शासननिर्णयामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे [३].
ऱ्हस्व व दीर्घ हे उच्चारभेद मराठीत स्थानपरत्वे आढळतात, परंतु संस्कृत व्याकरणाच्या प्रभावामुळे मराठीतही ‘अ’ या स्वराचा दीर्घ स्वर ‘आ’ मानला गेला आहे. हे स्वनवैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य आहे. ज्याप्रमाणे ‘कथित’ या शब्दातील ‘इ’ व ‘पडीक’ या शब्दातील ‘ई’ वेगळा आहे, त्याचप्रमाणे ‘घर’ या शब्दातील ‘अ’ व ‘कणीस’ या शब्दातील ‘अ’सुद्धा वेगळा आहे. हा भेद दाखवण्यासाठी देवनागरीत कोणतीही सोय नाही. याचप्रमाणे ‘आ’, ‘ए’ व ‘ओ’ या स्वरांचे ऱ्हस्वत्व दाखवण्यासाठीही लिपीत कोणतीही सोय नाही.
मोडी लिपी
ही लिपी बराच काळ महाराष्ट्रात प्रचलित होती, परंतु १९५० साली बाळासाहेब खेरांनी या लिपीचा व्यवहार अधिकृतरीत्या थांबवला. लोकव्यवहारातून ती आता जवळपास बाद झाली आहे. हौशी लोक मात्र ती अजूनही शिकतात व तिचा वारसा जतन करू पाहतात. या लिपीतील सर्व पायाभूत चिन्हे मोडीसाठीच्या युनिकोड-तक्त्यात पाहता येतील [४]. मराठेशाहीमध्ये हिचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला आढळतो. या लिपीचा वापर धार्मिक कामांकरिता होत नसे. लेखन सलग व अखंड होत असल्याने ही लिपी देवनागरीहून सोयीची होती. अन्य तत्कालीन भारतीय लिप्यांप्रमाणेच या लिपीमध्येही शब्दांनंतर मोकळ्या जागा सोडल्याचे दिसत नाही. शब्दांवरील शिरोरेषादेखील अखंड आढळतात. देवनागरी लिपीपेक्षा हिचे एक वेगळेपण असे की हिच्यात ऱ्हस्व व दीर्घ हा स्वरभेद कोणत्याही चिन्हांकरिता केलेला आढळत नाही. मागे पाहिल्याप्रमाणे देवनागरीमध्ये काही स्वरांकरिता ऱ्हस्व-दीर्घत्वाची चिन्हे आहेत (उदा. ‘इ’/‘ई’ व ‘उ’/‘ऊ’) व काही स्वरांकरिता नाहीत (उदा. ‘अ’, ‘आ’, ‘ए’, ‘ओ’). मोडीत कोणत्याच स्वराकरिता हा भेद दाखवण्यासाठी चिन्हे नसल्यामुळे देवनागरीप्रमाणे इथे ही विसंगती ठरत नाही.
लॅटिन
ही लिपी वापरून मराठी लिहिण्याला महाराष्ट्रात कुठेही कोणतीही अधिकृत मान्यता नाही, परंतु तरीही ती मराठी समाजाकडून विपुल प्रमाणात वापरली जात असल्याचे दिसते. केवळ अधिकृत मान्यताच नव्हे, परंतु या लिपीतून मराठी लिहिण्याकरिता कोणतीही प्रमाण व्यवस्थाही नाही. युरोपीय सत्ता भारतात पाळेमुळे धरू लागल्यावर या लिपीचा वापर भारतातील अनेक भाषांच्या लेखनव्यवहारात होऊ लागला. मराठी त्यांपैकीच एक. ही लिपी भारतीय लिपिकुळातली नाही व अन्य भारतीय लिप्यांपेक्षा हिची व्यवस्थादेखील वेगळी आहे. देवनागरी व मोडी लिपीच्या वर्णनात पाहिल्याप्रमाणे प्रत्येक अक्षर स्वरयुक्त असणे हा विशेष या लिपीत आढळत नाही. भारतीय लिप्यांमध्ये पायाभूत घटक स्वरयुक्त ‘अक्षर’ हा असतो, लॅटिनसारख्या लिप्यांमध्ये मात्र तो स्वररहित ‘वर्ण’ हा असतो.
संगणकांच्या भारतातील प्रवेशानंतर त्यांवर भारतीय भाषांचे लेखन पुष्कळ काळ दुष्कर होते. त्या काळात ज्यांना स्वभाषांकरिता व स्वभाषांमध्ये कामे करायची होती, त्यांना याकरिता लॅटिन वापरण्याखेरीज कोणताही इलाज नव्हता. सहध्वनिसंच (मोबाईल) व समाजमाध्यमे प्रचलित झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीचा काही काळ लोकांना आपल्या लिपीत लिहिता येणे सहजसाध्य नव्हते व आता बऱ्याच जणांना लॅटिनमध्ये लिहिणे-वाचणे अंगवळणी पडले आहे. मराठी शिकण्याबाबत समाजाचा घटता उत्साह हेदेखील लिपिबदलामागील एक कारण असण्याची शक्यता आहे.
इंग्रजी भाषादेखील याच लिपीत लिहिली जात असल्यामुळे जिथे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांचा मिश्र व्यवहार लिहिलेला आढळतो तिथे लेखका/लेखिकेच्या प्राधान्यक्रमांत फरक आढळून येतात. ज्यांच्या संभाषणात इंग्रजी भाषा मराठीहून अधिक आहे ते इंग्रजी शब्दांचे लेखन अचूक करतात व त्याच अक्षरांचा मराठी शब्द थोडासा बदलून लिहितात. हा बदल कसा केला जाईल याला कोणताही ठोस नियम नाही. उदा. ‘गोड’ हा मराठी शब्द तसे पाहता ‘god’ असा लिहिला जायला हवा, परंतु त्यामुळे इंग्रजीतल्या ‘गॉड’ (देव) या शब्दासह गोंधळ उत्पन्न होत असल्यामुळे लोक त्याचे लेखन ‘goad’ असे करताना आढळतात. याचप्रमाणे मराठीतल्या ‘तो’ या शब्दाकरिता काही जण ‘toh’, काही जण ‘toa’ असे निरनिराळे प्रयोग करताना दिसतात. ज्यांना इंग्रजी लेखनव्यवस्थेची पुरेशी सवय नाही अशांकडून मराठी लेखनाचे त्यांनी ठरवलेले ढोबळ संकेत इंग्रजी लेखनावर लावले गेल्याचीही उदाहरणे पुष्कळ दिसतात. उदा. ‘please’करिता ‘plij’ असे लिहिणे.
या लिपीच्या मराठीत होणाऱ्या वापरात संदिग्धता पुष्कळ आहे. ‘अ’, ‘आ’ व ‘ॲ’ या स्वरांकरिता ‘a’ हे चिन्ह वापरले जाते. ‘i’=‘इ’ व ‘ee’=`ी’/‘ई’ हा भेद कधी कधी दाखवला जातो, कधी कधी दाखवला जात नाही. हेच `ु’/‘उ’करिता ‘u’ व `ू’/‘ऊ’करिता ‘oo’ या जोडीचेही. ‘त’ व ‘ट’ या दोन ध्वनींकरिता ‘t’ हे एकच चिन्ह असणे व तसेच ‘द’ व ‘ड’ ह्यांकरिता ‘d’ हे एक चिन्ह असणे ही या लिपीतील आणखी एक संदिग्धता. महाप्राण ध्वनी (उदा. ‘ख’, ‘छ’, ‘ठ’) हे त्यांच्या अल्पप्राण ध्वनींच्या चिन्हासमोर ‘h’ हे अक्षर लिहून बनवले जातात, परंतु तेच अक्षर ‘s’समोर वापरून ‘श’/‘ष’ हे ध्वनीदेखील निर्देशित केले जातात. त्यामुळे इथे नियमिततेचा अभाव दिसून येतो.
काही ठिकाणी देवनागरी व मोडीत असणारी संदिग्धता लॅटिन लेखनात विनाकारण आलेली दिसते. उदा. ‘च’ वर्गातील उच्चार लॅटिनमध्येही संदिग्धपणे लिहिले जातात. त्यातल्या त्यात ‘झ’करिता ‘jh’ अथवा ‘z’ असे पर्याय आढळतात, परंतु त्यांचाही वापर नियमितपणे होतोच असे नाही. काही वेळा हे पर्यायदेखील अनियमितपणे वापरले जातात. एकुणात ही लिपी पुष्कळ प्रचलित असली तरी हिच्या वापराचे कोणतेही प्रमाण प्रघात आज ठरलेले दिसत नाहीत. निरनिराळ्या सामाजिक परिस्थितींमधले लोक हिचा वापर त्यांच्या सोयीनुसार व जीवनशैलीनुसार करताना दिसतात.
या धावत्या आढाव्यानंतर आपण या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की लेखन नेहमीच अचूक ध्वनिलेखनाकरिता केले जात नाही. त्यात नियमितता असेलच असेही नाही. संकेतांवर आधारलेली ती एक व्यवस्था आहे. जास्तीत जास्त रूढ, परंतु त्याचसह प्रमाण व्यवस्थांचा वापर वाढणे व स्वभाषेच्या लेखनेतिहासाबाबत नवीन पिढीला पुरेशी माहिती असणे हे समाजोन्नतीचे ठरू शकते.
संदर्भ:
[१]: https://www.unicode.org/charts/PDF/U0900.pdf
[२]: https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202211101530029233......pdf
[३]: https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202301021718159833.pdf
[४]: https://www.unicode.org/charts/PDF/U11600.pdf