निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा परिणाम पालिका निवडणुकीत दिसणार?
18-Feb-2023
Total Views |
11
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातील एक महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने देण्यात आल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाचा परिणाम येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येही पाहण्यास मिळण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात येत आहे.
मागील २० ते २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असणारी मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा एक महत्त्वाचा गड मानला जातो. एकनाथ शिंदेंसोबत चाळीस आमदारांकडून करण्यात आलेल्या बंडाचा परिणाम हा शिवसेनेतील नागरसेवकांवरही पाहण्यास मिळाला.शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, आत्माराम चाचे, यशवंत जाधव यांसारखे काही महत्त्वाचे नगरसेवक शिंदे गटात गेले आणि शिवसेनेतील उर्वरित नगरसेवकांमध्येही संभ्रमता निर्माण झाली.
आपले आमदार आणि खासदारच शिंदे गटात गेल्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनाच शिवसेनेच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्रावर सह्या घ्याव्या लागल्या. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचा परिणाम येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक (यादी २०१७नुसार)
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - ८
समाजवादी - ५
मनसे - ८
एआयएमआयएम - २
अपक्ष - ३
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आम्हाला अपेक्षितच होता. परंतु अद्याप सर्वाच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. तसेच ज्या पद्धतीने काही घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महाविकासआघाडीला लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे. कटकारस्थान करणारा महाराष्ट्र नव्हे आणि ज्यांनी कटकारस्थाने केलीत त्यांचे कोथळे बाहेर काढलेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर, ठाकरे गट
खरी शिवसेना कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले
निवडणूक येतात आणि जातात. गेले सहा महिने निवडणूक आयोगाकडे निर्णय राहिला होता. मेरीटवर चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळणार हेच आम्ही वारंवार सांगत होतो. तसेच या निर्णयांचा सर्वच निवडणुकांवर परिणाम होणार आहे. आत्तापर्यंतचा जो संभ्रम होता तो आता दूर झाला आहे आणि खरी शिवसेना कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले आहे.