मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगाने दि. १७ फेब्रुवारी रोजी दिला. आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. त्यामुळे पक्ष चिन्ह, पक्षप्रमुख पद आणि पक्षाचे नाव ही उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन अद्याप ही उद्धव ठाकरेंकडेच आहे. पंरतू शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याची मालकी शिवसेना पक्षाकडे नाही तर ती शिवाई ट्रस्ट कडे आहे.
सध्या शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते लीलाधर डाके हे आहेत. असे म्हणटले जाते की, शिवसेना भवनाची जागा मिळवण्यासाठी दिवाकर रावते, सुभाष देसाई, नेते अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विशाखा राऊत यांनी त्याकाळी मेहनत घेतली होती. सध्या हीच मंडळी या ट्रस्टची ट्रस्टी आहेत.अद्याप या ट्रस्टीपैकी कोणीही शिंदे गटात गेलेला नाही. . त्यामुळे जोपर्यंत शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तोपर्यत शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच रहाणार आहे हे स्पष्ट होत आहे. पंरतू तरी देखील शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा केले जाऊ शकतो.
शिवसेना भवनाचा इतिहास
१९ जून १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी पर्ल सेंटर येथे च्या २ खोल्यांमध्ये शिवसेना पक्षाचे कामकाज चालत होते. पण, शिवसैनिकांचा ओघच इतका मोठा होता की बाळासाहेबांना स्वतंत्र अशा मोठ्या जागेची गरज भासू लागली आणि त्यानंतर शिवाजी पार्क येथील एक जागा बाळासाहेबांच्य़ा पंसतील पडली जिथे आज शिवसेना भवन आहे. शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मीनाताई ठाकरे, पहिले आमदार प्रिन्सिपल वामनराव महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे या शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी होते. या ट्रस्टी मंडळींनीच मूळ मालक उमरभाई यांच्याकडून शिवसेना भवनसाठी जागा घेतली. त्यामुळे शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टीच्या मालकीचे आहे. शिवाई ट्रस्टच्या ट्रस्टींपैकी मीनाताई ठाकरे, हेमचंद्र गुप्ते, वामन महाडिक यांचे निधन झाले. तर, शाम देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई यांनी राजीनामा दिला.