मुंबई : मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या एक मोठा चिंतेचा विषय बनला असून दिवसेंदिवस मुंबईतील प्रदूषण वाढत आहे. नुकताच एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानची ही आकडेवारी असून देशातही मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.
स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स नुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असणाऱ्या राजधानी दिल्लीला मागे टाकत मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. दरम्यान मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर असून २९ जानेवारी रोजी मुंबई जगात दहाव्या स्थानावर होती. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादी मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचा समावेशच नाही.
जगातील सर्वात प्रदूषित शहरं कोणती?
१. लाहोर (पाकिस्तान)
२. मुंबई (भारत)
३. काबूल (अफगाणिस्तान)
४. काओशुंग (तैवान)
५. बिश्केक (किर्गिस्तान)
६. अक्रा (घाना)
७. क्राको (पोलॅंड)
८. दोहा (कतार)
९. अस्ताना (कझाकिस्तान)
१०. सॅंटियागो (चिली)
दिवसेंदिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत चालल्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या असून मुंबई महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणाबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान वाईट श्रेणीतील हवा असणाऱ्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार हे बळवण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.