नवी दिल्ली : आर्थिक अनियमतेप्रकरणी प्राप्तिकर खात्याने मंगळवारी बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये ‘सर्वेक्षण’ केले. यावर भाजपने आणि काँग्रेसने परस्परांवर टिका केली आहे.
बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने कागदपत्रांची तपासणी केली आहे. बीबीसीवर आर्थिक अनियमितता, ट्रान्सफर प्राइसिंग, मोठ्या प्रमाणात नफा वळविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर खात्यातर्फे सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी बीबीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती घेतल्याचेही समजते. दिल्ली आणि मुंबई कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर बीबीसीने प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसी पूर्ण सहकार्य करत असून या परिस्थितीतून लवकरत मार्ग निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्राप्तिकर खात्यातर्फे वेळोवेळी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जातात. बीबीसीवरील कार्यवाहीदेखील त्याचाच एक भाग असून खात्यातर्फे माहिती देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप आणि काँग्रेसची परस्परांवर टिका
बीबीसीचे कृत्ये पाहिली तर ही संस्था म्हणजे भ्रष्ट बकवास कॉर्पोरेशन बनल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे. ते म्हणाले, बीबीसीचा प्रपोगंडा आणि काँग्रेसचा अजेंडा एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीबीसीवरील कारवाईविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांची प्रतिक्रिया भारतीयांसाठी चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी बीबीसीवर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी बंदी लादल्याचीही आठवण काँग्रेसला करून दिली.