संकल्प आणि ध्येयपूर्ती

    30-Dec-2023
Total Views | 154
New Year Resolutions

आज इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून २०२४ हे नववर्ष नवचैतन्यासह उगवतीला येईल. आयुष्य, माणसं आणि सभोवतालची परिस्थिती नवीन वर्षातही तशीच असली, तरी एक नवतेची, स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा यादरम्यान वातावरणात भारावलेली दिसते. त्यातूनच नूतन वर्षाचे नवसंकल्प सोडले जातात. तेव्हा, यंदाही अशाच नवसंकल्पांची गुढी उभारताना ते संकल्प यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी नेमके काय करावे, यासंबंधीचे अगदी सोप्या शब्दांत दिशादर्शन करणारा हा लेख....

’मी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेईन’ हा संकल्प इतर सर्व संकल्पांपेक्षाही महत्त्वाचा आणि पहिला संकल्प असतो.
’मी माझ्या जगण्याची १०० टक्के जबाबदारी घेईन, परिस्थितीला इतरांना दोष देण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवणार नाही’ हे ठरवूनच नवीन वर्षात ज्यांना प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी हा लेख आहे.

आपल्या अंतर्मनात बालपणी काही आकृतीबंध (पॅटर्न्स) तयार झालेले असतात.

आपल्या नकळत मनाचं एकप्रकारे ‘प्रोग्रॅमिंग’ झालेलं असतं. उदा. एखादं मूल चालताना खुर्चीला अडखळून पडलं, तर कुणीतरी त्याचं सांत्वन करताना खुर्चीला रागावतं, फटका देत ’हात रे!’ म्हणत मूलाची समजूत काढतं.

स्वतःची चूक न पाहता, परिस्थितीला दोष देण्याची इथूनच सुरुवात होते. अर्थात, त्या वेळी मुलाला समजावत बसणं शक्य नसतं, त्याची तेवढी समज विकसितही झालेली नसते. पण, मोठं झाल्यावरही आपण असंच वागत असू, तर याचा अर्थ बालपणीचं जुनं ’सॉफ्टवेअर’ आपण अजूनही वापतोय, ते ’अपडेट’ केलेलं नाही, हे समजून घ्यायला हवं. ’अपडेट’ होणं म्हणजे आयुष्याची, समस्यांची, दुःखाची जबाबदारी घेणं. ‘जबाबदारी घेणं’ म्हणजे अपराधी भावनेत बुडून स्वतःला दोष देत बसणं नाही, तर ‘मीच माझ्या समस्या सोडवणार’ असा निश्चय करणं!

इतरांना, परिस्थितीला दोष देत बसल्यानं बदलत काहीच नाही. कारण, त्यात बदलाची वाट बघत बसण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पण, जबाबदारी घेतल्यानं, मनाच्या सुप्त शक्ती जागृत होतात आणि मार्ग दिसू लागतो.

मी जबाबदारी घेईन, तक्रारी आणि नुसती कारणं न शोधता, उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित ठेवेन, असा पहिला संकल्प नवीन वर्षी प्रत्येकानं घ्यायचा आहे.

दुसरा संकल्प जागृत राहण्याचा करुयात. जागं राहणं म्हणजे पाच ज्ञानेंद्रियं सतर्क असणं. मन आणि मेंदू कार्यक्षमतेनं वर्तमानात असणं. आपलं बाह्यमन कधी-कधी खरंतर दिवसातून वारंवार डुलक्या घेतं, आपली जागृती कमी पडते, मग ताबा अंतर्मन घेतं आणि आजवर सराव केलेले ’पॅटर्न’ गिरवतं. बर्‍याचदा मनातले हे जुने ’पॅटर्न’ जुन्या समजुती कालबाह्य झालेल्या असतात, जुनं ’सॉफ्टवेअर’ उपयोगाचं नसतं तशा! आपलं समजुतींचं ’सॉफ्टवेअर अपडेट’ करणं आपल्या हिताचं असतं. त्यामुळे नवं दिसतं, नवं सूचतं!
आपल्या मनात येणारे विचार तपासा. त्यातले जे विचार ठाम आहेत, त्यावर प्रत्यक्ष कृती करा. नाती, पैसा, आरोग्य, समाज यांविषयी मनातल्या समजुती लिहून काढा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की, मला जे वाटतंय ते सत्य आहे का? काही वेगळा दृष्टिकोन आहे का? असू शकतो का? वेगळा अनुभव असणारं कुणी आहे का?
मुळात माझ्या मनातल्या समजुती मला बळ देणार्‍या आहेत की, हताश-निराश करणार्‍या आहेत? जर नकारात्मक असतील, तर मी जागृतीपूर्वक नवीन धारणा तयार करेन, नवा विचार स्वीकारून पाहीन.
जागृती म्हणजे वर्तमानात राहणं, जुन्या शिळ्या आकृतीबंधातून मुक्त होणं आणि लहान मूल जसं जगाकडे पाहतं, तितकंच नावीन्य आणि कुतूहल जागं ठेवणं.
आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूयात. आपले संकल्प किंवा ध्येय लिहून समोर ठेवा!
भिंतीला आरशाला चिकटवा.
 
किती ऐकलं?
किती केलं?
आजपर्यंत सगळं करूनही यश मिळत नसेल, तर कृती योजनेसहीत ध्येय लिहा.
मनाला आणि मेंदूला फक्त स्वप्नं देऊन, ती प्रत्यक्षात येत नसतात. संगणकाला काम करायला कमांड लागते, तशी कृती द्यावी लागते.
एका कागदाचे घडी घालून/ रेघ आखून दोन समान भाग करा.
एका बाजूला सर्व ध्येयं लिहून काढा.
ध्येयं म्हणजे जे साध्य साधायचंय/करायचंय ते!
प्रत्येक ध्येयासमोर ते साध्य करण्यासाठी काय करणार, त्याची कृती लिहा.
ही झाली ’कृती योजना.’
उदा. नियमित व्यायाम करायचा आहे, हे ध्येय असेल तर काय? किती? कसं? कधी? यांची उत्तरं समोर लिहा.
उदा.
ध्येय-व्यायाम
 
काय? चालणं
  
किती? २० मिनिटं
कसं? नियम-घरापासून सोसायटीला दोन गोल फेर्‍या, न बोलता.
कधी? सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन बाहेर पडल्यावर.
अजून एक उदाहरण पाहू.
 
ध्येय-वाचन
काय? प्रवासवर्णन
किती? रोज दोन पानं
कसं? गॅलरीतल्या खुर्चीत बसून
कधी? दुपारी चहा/कॉफीनंतर लगेच.
काहीही ठरवताना आधी उत्तरं लिहा.
 
काय? किती? कसं? कधी?
ध्येय लिहा असं सगळेच सांगतात. पण, त्या ध्येयाशेजारी कृती योजना लिहा, ते महत्त्वाचं असतं आणि कृती योजना ध्येय साध्य करण्यास मदतरूप ठरते. ध्येयासमोर कृती म्हणजे काय करायचं? ते लिहा. कृती महत्त्वाची. अशा प्रकारे नवीन वर्षासाठी सज्ज व्हा आणि ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू करा, नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
कांचन दीक्षित
https://kanchandixit.com/
https://www.facebook.com/timemanagementpune/
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121