भारतीय लष्कराची धडक कारवाई! जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला
23-Dec-2023
Total Views | 97
नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते, असे सांगण्यात येत आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले. उर्वरित तीन दहशतवादी त्यांच्या साथीदाराचा मृतदेह सीमेपलीकडे घेऊन गेले. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने 'X' वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
२२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सीमेवर चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून टिपण्यात आल्या होत्या. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. त्यात एका दहशतवादी मारला गेला. त्याचा मृतदेह इतर साथीदार दहशतवाद्यांनी सीमापार फरफटत नेल्याचे दिसून आले, अशी माहिती देण्यात आली.
पुंछमध्ये तीन संशयास्पद मृतदेह सापडले!
त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. हल्ल्याच्या ठिकाणाहून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत, ज्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले.