नीलकंठ मंदिर पाडून बांधली जामा मशीद शमसी; लवकरच सर्वेक्षण होणार!

    20-Dec-2023
Total Views | 323
ASI agrees to survey Jama Masjid in UP's Badaun to verify temple claims
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातील जामा मस्जिद शमसी आणि नीलकंठ मंदिर वादावर आता ६ जानेवारी २०२३ रोजी न्यायालय सुनावणी करणार आहे. जामा मशीद शमसीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाशी संबंधित वाद आणि तेथे पूजा करण्यास परवानगी देण्याच्या मागणीवर न्यायालयात सुनावणी झाली.या प्रकरणाबाबत ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’च्या वतीने दि. १९ डिसेंबर २०२३ रोजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (फास्ट ट्रॅक) न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. आपली याचिका योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी हिंदू महासभेने राजपत्रातील पुरावेही सादर केले.

ऑगस्ट २०२२ मध्ये, हिंदू महासभेचे राज्य संयोजक मुकेश पटेल यांनी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी बदाऊनच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिंदू पक्षाने बदाऊनच्या जामा मशीद शमसी येथे पूजा करण्याचा अधिकार आणि मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाची मागणी केली होती. जामा मस्जिद शमसीच्या जमिनीवर पूर्वी नीळकंठ महादेव मंदिर होते, असा दावा त्यांनी केला होता. मुस्लिम शासकांनी हे मंदिर पाडून मशीद बांधली. तेथे अजूनही मंदिराचे अवशेष असल्याचा युक्तिवाद करून हिंदू पक्षाने तेथे पूजेची परवानगी मागितली होती.
 
या प्रकरणी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान जामा मशीद व्यवस्था समिती, जिल्हा प्रशासन, वक्फ बोर्ड, पुरातत्व विभाग यांनी आपापल्या बाजू मांडल्या आहेत. ही याचिका फेटाळण्याची मागणी जामा मशीद शमसीच्या वतीने करण्यात आली आहे. दि. १९ डिसेंबर रोजी या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हिंदू महासभेचे वकील वेदप्रकाश साहू यांनीही जामा मशीद शमसीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गॅझेटियरमध्ये उपस्थित असलेले पुरावे याचिकेच्या समर्थनार्थ न्यायालयाला देण्यात आले आहेत. आता याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. असा दावा केला जात आहे की उत्तर प्रदेशातील अयोध्या, काशी आणि मथुरा नंतर बदायूंतील जामा मशीद शमसी येथेही इस्लामिक आक्रमकांनी भगवान शंकराचे मंदिर उद्ध्वस्त करून बांधले होते.

हिंदू पक्षाचा दावा आहे की, या ठिकाणी इस्लामिक आक्रमकांचे भारतात आगमन होण्यापूर्वी भगवान शिवाचे नीलकंठ मंदिर होते. भारताचा पहिला इस्लामी शासक कुतुबुद्दीन ऐबकचा जावई इल्तुत्मिश याने बदाऊनचा सुभेदार असताना हे मंदिर पाडून येथे जामा मशीद शम्सी बांधली.याचा पहिला पुरावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI) च्या १८७५ ते १८८० या कालावधीत बदाऊन ते बिहारपर्यंत केलेल्या ‘टूर्स इन द गंगेटिक प्रॉव्हिन्सेस फ्रॉम बडाऊन टू बिहार’ या १४८ वर्ष जुन्या अहवालात सापडला आहे. ते स्वतः ASI चे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी तयार केले होते.या अहवालाच्या पहिल्याच पानावर बदाऊनच्या वादग्रस्त जामा मशीद शमसीचा सर्वेक्षण अहवाल आहे. या पाहणी अहवालात असे लिहिले आहे की बदायूंमध्ये इस्लामिक आक्रमकांच्या राजवटीपूर्वी राजा महिपालने हरमंदर नावाचे हिंदू मंदिर बांधले होते. मुस्लिम आक्रमकांनी ती उद्ध्वस्त करून या ठिकाणी बदाऊनची जामा मशीद बांधली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121