उबाठाचा नवीन नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता! शिवसेनेकडून घोषणाबाजी; कठोर कारवाईची मागणी
18-Dec-2023
Total Views | 48
नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याची माहिती नितेश राणे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘उबाठाचा नवीन नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता!’ अशा घोषणा यावेळी देण्यात आला.
‘सलीम कुत्ता’ पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्यासोबत डान्स पार्टी केल्याचे पुरावे नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी सभागृहात सादर केले. या गंभीर विषयाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’च्या माध्यमातून समयमर्यादेत (टाईमबॉण्ड पद्धतीने) तपास करण्याची घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले असून, ठाकरे गटाच्या ‘कुत्ता’ कनेक्शनचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.
सोमवारी शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरत याविरोधात जोरदार आंदोलन केले. ‘सलीम कुत्ता हाय हाय...’, ‘उबाठाचा नवीन नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता!’ अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. मंत्री दादा भुसे, आमदार भरत गोगावले, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक सदस्य यात सहभागी झाले. ‘सलीम कुत्ता’सोबत डान्स पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.