ठाणे : प्रथमच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तळागाळापर्यत पोहचला आहे. ठाणेकरांच्या दारी आलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्लीचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी यांनी शनिवारी (दि.१६ डिसेंबर) विविध योजनांचा आढावा घेत सूचना करून त्याचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवण्याचे निर्देश दिले.दरम्यान, ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पद भरतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्त्वावर होणारी भरती या योजनांच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शनिवारी प्रथमच ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर,ठाणे आणि नवीमुंबईचा दौरा करून विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना आदींशी संवाद साधला. ठाणे मनपा मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीस, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी गोदेपुरे, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते.
त्यानंतर, कै. अरविंद पेंडसे सभागृहात पारधी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात, महापालिका प्रशासनाने विविध योजना व धोरणांची विस्तृत माहिती विषद केली. त्यावर, महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना,पद भरती, पंतप्रधान आवास योजना यांच्याविषयी काही सूचना केल्या. तसेच, या बाबींची पूर्तता करून त्याचा अहवाल आयोगास पाठविण्यात यावा, असे पारधी यांनी स्पष्ट केले. तसेच, कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असलेले अनुसूचित जातींचे कर्मचारी यांचे पगार वेळेत होतात की नाही, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो की नाही यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देशही पारधी यांनी दिले.
दरम्यान, खा. संजीव नाईक यांनी, पारधी यांनी प्रथमच तळागाळात येऊन योजनांचा आढावा घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या या भेटीला महापालिकेनेही त्रुटी दूर करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर प्रत्येकाला मुलभूत अधिकार आहे. तेव्हा, प्रत्येक नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती समुहांना न्याय मिळायला हवा. या धारणेतुन ही संवादाची कल्पना होती. त्यावर हा संविधानिक आयोग साकल्याने विचार करील. ठाणे महापालिका प्रशासन कार्यक्षम आहे. त्यांच्याकडून विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी केली जाते. त्यात काही त्रुटी राहील्या असतील तर त्याची पूर्तता करावी.
खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे