दिसपुर : आसामच्या हिमंता बिस्वा सरकारने राज्यातील सरकारी मदतीने चालवलेले १२८१ मदरसे बंद केले आहेत आणि त्यांच्या जागी इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. त्याबाबतचे आदेशही शासनाने जारी केले आहेत. आता या मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षणाऐवजी सामान्य विषय शिकवले जाणार आहेत.
१२८१ मदरसे बंद करण्याच्या आसाम सरकारच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, राज्याचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी ट्विटरवर लिहिले की, सर्व सरकारी आणि प्रादेशिक शाळांना SEBA अतंर्गत १२८१ मदरशांना माध्यमिक शिक्षण शाळांमध्ये रूपांतरित करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आसाम सरकारने जारी केलेल्या यादीनुसार, आसाम-बांगलादेश सीमेवर असलेल्या धुबरी जिल्ह्यात बहुतांश मदरसे बंद करण्यात आले आहेत. त्यांची संख्या २६८ आहे. याशिवाय बारपेटा, नोगाव आणि गोलपारा आदी भागातही मोठ्या प्रमाणात मदरसे बंद करण्यात आले आहेत. बांगलादेशातून येणाऱ्या अवैध घुसखोरांनीही हे जिल्हे भरलेले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आधीच सांगितले आहे की त्यांना राज्यातील सर्व मदरसे बंद करायचे आहेत कारण नवीन भारतात लोकांना मदरसे नव्हे तर डॉक्टर, अभियंते आणि व्यावसायिक तयार करणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची गरज आहे.
यापूर्वी आसाममध्ये ६०० मदरसे बंद करण्यात आले होते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान आयोजित सभेत सांगितले होते की त्यांनी राज्यातील ६००मदरसे बंद केले आहेत आणि सर्व मदरसे बंद करण्याची इच्छा आहे.
या वर्षी मे महिन्यातही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ३०० मदरसे बंद करणार असल्याचे सांगितले होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याला पोलीस आणि जातीयवादी संघटनांमधील चर्चेचे फलित म्हटले होते. आसाम सरकार राज्यातील बेकायदेशीर घुसखोर आणि कट्टरतावाद यांच्याबाबत अत्यंत कडक वृत्ती अवलंबत आहे.