नागपूर : जुन्या पेन्शनबद्दल येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बुधवारी जुन्या पेन्शनबद्दल राज्य सरकारची कर्मचाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. त्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "काल आमची कर्मचारी संघटनांसोबत बैठक पार पडली असून विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकार जुन्या पेन्शनचा सकारात्मक विचार करेल. तसेच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीबद्दल योग्य निर्णय घेतला जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, "२०३१-३२ पासून जुनी पेन्शनबद्दलची अंमलबजावणी सुरु होणार आहे असे कर्मचाऱ्यांना सांगिल्यानंतरही आम्हाला मार्ग काढून द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचे चार ते पाच प्रश्नांवर सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत याबद्दलता निर्णय घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले," अशी माहिती त्यांनी दिली.
जास्त ताणून न धरता संपाच्या बाबतीत टोकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहन कर्माचाऱ्यांना केले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कांदा, इथेनॉल प्रश्न यासारख्या तीन-चार प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अमित शहांची वेळ घेतली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.