ठाणे महापालिका शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी अनुभवले 'खगोल विश्व'

"विज्ञानमंच’ या उपक्रमांतर्गत नेहरू तारांगण आणि विज्ञान केंद्राची सहल

    07-Nov-2023
Total Views | 38
Nehru Planetarium News

ठाणे : आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी एक दिवस खगोल विश्वाची सैर केली.

ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी यासाठी ‘विज्ञानमंच’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या उपक्रमात महापालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, मागील आठवड्यात पालिकेच्या विविध शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगण येथे भेट दिली. ठाणे परिवहन सेवेच्या नऊ बसेसमधून हे विद्यार्थी वरळी येथे गेले होते.

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण येथे ब्रम्हांडाचे रहस्य उलगडून दाखवणारा ‘वैश्विक जीवन’ हा खेळ पाहिला. त्यावेळी, नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे आणि मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहरू सायन्स सेंटर येथे ‘सायन्स ओडिसी’ हा विशेष खेळ पाहिला. थ्री डी आणि एसओएस हे खेळही पाहिले. विज्ञान केंद्रातील सायन्स गॅलरीमध्ये मनसोक्त भ्रमंती केली. या भेटीदरम्यान मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रा. नामदेव मांडगे, महेन्द्र केळकर, विनायक रानडे, हेमंत काणे, निलिमा ठाकूर आणि कुंदा कारभारी यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याचे उद्दीष्ट

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करणे, निरिक्षण शक्ती वाढवणे आणि भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी पायाभरणी करणे हे विज्ञानमंच या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि विज्ञान सहली यांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थांना नवीन गोष्टी जाणून घेता आल्या. अनेक गोष्टींबाबत त्यांना कुतूहल असल्याचे जाणवले.

- दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121