आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंची एन्ट्री!
04-Nov-2023
Total Views | 48
मुंबई : राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चाळीचं काम सुरू असलेल्या ठिकाणची राज ठाकरेंनी पाहणी केली. चाळीतील स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
दरम्यान, वरळी बीडीडी, नायगाव बीडीडी आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. वरळीतील नागरिकांचा वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प आराखड्यातील काही बाबींबाबत आक्षेप आणि संभ्रम होता. याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरळी बीडीडी चाळीतील रहिवाश्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. प्रकल्पाच्या आराखड्याबाबत रहिवाश्यांमध्ये संभ्रम असून त्यांच्यासमोर पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करावे, अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.