मुंबई : मुंबईसह, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती कमी करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी केली. ही घरे अनेक वर्षांपासून विक्रीविना असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडाच्या घरांना दिवसागणिक मागणी वाढत असली, तरी गेल्या काही वर्षांपासून कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर येथील काही घरे विक्रीविना धूळखात होती. काही घरे तर दहा वर्षांपासून पडून आहेत. वारंवार सोडत काढून वा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत त्यांचा समावेश करूनही घरे विकली गेली नाहीत.
राज्यात जवळपास अशी ११ हजार घरे आहेत. या घरांचे वीज आणि पाणी देयक म्हाडाला भरावे लागते. त्यापोटी कोट्यवधींचा खर्च होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी या सर्व ११ हजार घरांच्या किमती कमी करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
.
पुन्हा लॉटरी काढणार
म्हाडाची राज्यभरात सुमारे ११ हजार घरे पडून आहेत. या घरांचे वीज आणि पाणी बिल म्हाडाला भरावे लागते. त्यापोटी बराच खर्च होतो. त्यामुळे अशा घरांच्या किमती कमी करून त्या पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.
- अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री