लखनऊ : वाराणसीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील स्मशानभूमीत पुरलेल्या ५ वर्षीय मुलीचा मृतदेह बाहेर काढून तिच्या बाजूला झोपलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद रफिक असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दशाश्वमेध परिसरातील सदानंद बाजार येथे राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रेवाडी तलाव येथील स्मशानभूमीत तिचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी मृत मुलीचे वडील तिच्या कबरीवर पाणी टाकण्यासाठी आणि फुले वाहण्यासाठी गेले असता त्यांना धक्काच बसला. तिथे जाताच त्यांना कबरीची माती काढलेली दिसली. त्यानंतर कबर खोदली असता त्यांना मुलीचा मृतदेह तिथे दिसलाच नाही. त्यांनी आजूबाजूला बघितले असता तिथेच राहणारा मोहम्मद रफिक उर्फ छोटू हा कब्रस्तानच्या एका कोपऱ्यात मुलीच्या मृतदेहासह झोपलेला आढळला. यावरून त्यांना आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची शंका आली आणि त्यांनी याप्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मोहम्मद रफिकला अटक केली. तसेच तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरु असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.