जावेदमियाँचा दुटप्पीपणा...

    10-Nov-2023
Total Views | 160
Javed Akhtar

श्रीराम मंदिराच्या उभारणीला ज्यांचा विरोध होता, त्या जावेदमियाँनी श्रीराम आणि सीता हे संपूर्ण देशाचे आहेत, कोणा एकाची त्यांच्यावर मालकी नाही, अशा आशयाचे परवाच राज ठाकरेंच्या दीपोत्सवात विधान केले. म्हणूनच जावेदमियाँनी श्रीराम मंदिराच्या निमित्ताने कोट्यवधी हिंदूंच्या मनातील प्रखर राष्ट्रवादाच्या भावनेची धास्तीच घेतलेली दिसते.

“गाझाचे लोक असाहाय्य असून, इस्रायल मानवताविरोधी आहे,” अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी नुकतेच केले होते. मग याच ‘हमास’ने मानवतेला काळिमा फासणारे कूकृत्य इस्रायलमध्ये केले, तेव्हा हे जावेदमियाँ कुठे नमाज अदा करत होते? रेल्वे, विमान का कुठल्या प्रवासात? अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मोकळा झाला, तेव्हाही याच जावेदमियाँनी “हा विषय एखाद्या चित्रपटाप्रमाणे संपला आहे. आम्हाला नमाजच अदा करायची आहे, ती आम्ही कुठेही करू,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे मुळातच ज्यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीला विरोध केला, मंदिराऐवजी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये ही प्राथमिकता आहे, असे म्हणत नाके मुरडली, त्यांना आता अयोध्येत उभे राहणारे श्रीरामाचे भव्य असे मंदिर आकर्षित करत आहे. म्हणूनच जावेदमियाँना आता ‘श्रीराम आणि सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहेत, ते केवळ हिंदूंचा वारसा नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीची संपत्ती आहे,’ असा एकाएकी साक्षात्कार झाला.

त्याचवेळी ‘हिंदूंचे मन हे विशाल असते,’ असे म्हणत हिंदूंच्या सहिष्णुतेवरही जावेदमियाँनी शिक्कामोर्तब केले. असे हे जावेदमियाँ या वर्षाच्या प्रारंभी जेव्हा पाकिस्तान दौर्‍यावर गेले, तेव्हाही आम्ही ‘जावेदमियाँचा सोयीस्कर स्मृतिभ्रंश’ (दि. 23 फेब्रुवारी) या अग्रलेखातून त्यांचा हाच पुरोगामी गोंधळ अधोरेखित केला होता. त्याचीच पुन्हा एकदा त्यांच्या परवाच्या विधानांतून प्रचिती यावी.
जावेदमियाँनी आजवर केवळ आपल्या विधानांतून नव्हे तर चित्रपटांतूनही सर्वसामान्य प्रेक्षकांचा कसा बुद्धिभेद केला, हेही पाहायला हवे. ‘शोले’मधील ज्या गावात वीज नाही, त्या गावात ध्वनिक्षेपकावर ‘अजान’ मात्र ऐकायला येते. ‘अब्दुल चाचा’ हे नेहमीच नेकदिल, तर ‘पंडित’, ‘ठाकूर’ हे मात्र खलनायक! धर्मांधतेचे विष सर्वाधिक पेरले, ते याच सलीम-जावेद या जोडीने. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ज्या मनसेने आपण हिंदुत्वाचा विषय अजेंड्यावर घेतला आहे, असे जाहीर केले होते, ती मनसे अशा जावेदमियाँनाच ‘मनसे दीपोत्सवा’त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करते. मग उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वासारखेच राज ठाकरे यांचेही हिंदुत्व सोयीस्कर आहे का, असाच प्रश्न म्हणूनच उपस्थित करावासा वाटतो. आपण किती पुरोगामी आहोत, हे दाखवण्यासाठीच रामनामाचा दिखाऊ नारा यांना द्यावा वाटतो का?

मनसेने दीपोत्सवाला कोणाला बोलवावे, हा त्यांचा प्रश्न. पण, दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका मॉलमध्ये ‘जश्न-ए-दिवाली’चा जो फलक लागलेला होता, तो तोडणारे कार्यकर्तेही मनसेचेच असल्याचे समजते. मग काही वर्षांपूर्वी ‘जश्न-ए-दिवाली’ म्हणण्यात गैर ते काय, असा प्रश्न उपस्थित करणारे हेच जावेदमियाँ मनसेच्याच दीपोत्सवाला परवा प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावतात, तेव्हा निश्चितच भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही.जावेदमियाँसारख्यांच्या मते, 2014 पर्यंत देशात सगळे कसे अगदी व्यवस्थित चालले होते. देशात जातीयवाद वगैरे नव्हता, तणाव नव्हता. केवळ काँग्रेसी कार्यकाळात शीख बांधवांचे हत्याकांड झाले, हजारो शीख बांधवांना जीवंत जाळण्यात आले, ठार मारण्यात आले, महिलांवर अत्याचार केले गेले. काश्मीरमध्येही काही विशेष घडले नाही. रातोरात काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलून लावण्यात आले. शेजारच्या ‘अब्दुल’नेच त्यांचा घात केला. जे नशिबवान ठरले, ते किमान शरणार्थी म्हणून इतरत्र जाऊ शकले. हजारो काश्मिरी पंडितांच्या नशिबी जीव वाचण्याचे सुख नव्हते. त्यांना अक्षरशः कापून काढले. गोध्रा कांडातही धर्मांधांनी कारसेवकांची बोगीच पेटवून दिली होती.

जळून कोळसा झाला त्यांचा. पेटवले आहेच; तर वेगळे काय होणार. पण, जावेदमियाँसारख्या विद्वानांच्या मते, देशात तरी सहिष्णुता कायम होती. 2014 मध्ये भाजप बहुमताने सत्तेवर आला. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. हे तेच नरेंद्र मोदी ज्यांच्या गुजरातमध्ये गोध्रा जळितानंतर हिंदूंनी संतप्त होत प्रत्युत्तर दिले होते. म्हणूनच जावेदमियाँसारख्या तथाकथित पुरोगाम्यांचा जीव तडफडला. अचानक देशात असहिष्णुता वाढीला लागली. पुरस्कारवापसी गँग सक्रिय झाली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, अशी बांग ठोकली गेली. देशाची प्रतिमा मलीन होते आहे, याचे भान या स्वतःला बुद्धिवादी मानणार्‍यांना राहिले नाही. आजही देशात अल्पसंख्याक असुरक्षित आहेत, असे एक धादांत खोटे ‘नरेटिव्ह’ सेट केले जाते.2024च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, अयोध्येत श्रीरामाचे भव्य असे मंदिर उभे राहत आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी सर्व मार्गांनी विरोध करून झाला.

मात्र, आता हे मंदिर निर्माणाधीन असल्याने कोट्यवधी हिंदू बांधवांच्या मनातील राष्ट्रवादाची भावना अधिक प्रखर होणार आहे. दिवाळीचा सण आता साजरा होत आहेच. जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’ असा उत्स्फूर्त नारा देत, दीपोत्सव साजरा केला जाईल. त्यामुळे तथाकथित पुरोगामीपणाचा ढोल या पुरस्कारवापसी गँगला वाजवता येणार नाही, हेच त्यांचे खरे दुखणे. म्हणूनच जावेदमियाँना श्रीराम आणि सीता हे सगळ्यांचे आहेत, असा एकाएकी झालेला हा साक्षात्कार. त्यात अख्तर स्वत: नास्तिक असल्याचा दावा करतात. पण, तरीही ते हिंदूंना ‘जय श्रीराम’च्या जागी ‘जय सियाराम’ म्हणण्याचा पुरोगामी शब्दच्छल करुन मोकळे झाले. खरं तर नास्तिक अख्तरांच्या सल्ल्यांची हिंदूंना गरजच नाही. कारण, दोन्ही घोषणा हिंदूंसाठी सारख्याच. पण, रामनामातही राजकीय भावनेने प्रेरित होऊन मुद्दाम असे डावे-उजवे निर्माण करण्यासाठीचा हा अनाठायी बुद्धिभ्रमच नाही का? असो. प्रखर राष्ट्रवादाची भावना हिंदूंच्या मनात जागृत झाली आहे आणि त्याचीच या तमाम पुरोगामींना धास्ती, हेच यामागील वास्तव!



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121