‘हमास’ या दहशतवादी संघटनेने शनिवारी पहाटे इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागत तसेच एकाच वेळी जमीन, समुद्र आणि हवाई हल्ले घडवून संपूर्ण जगाला चकित केले. गेल्या कित्येक दशकांत इस्रायलला इतक्या मोठ्या प्रमाणावरील दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले नव्हते. त्यानिमित्ताने...
‘हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलची सुरक्षा यंत्रणा भेदून शहरांमध्ये केलेला प्रवेश हिंसाचाराची तीव्रता वाढवणारा ठरला. दहशतवाद्यांनी इस्रायली सुरक्षारक्षकांसह नागरिकांना वेठीला धरत त्यांची हत्या केली, अपहरण केले. यातून लहान मुलांसह महिलाही सुटल्या नाहीत. महिला ‘हमास’ दहशतवाद्यांच्या अमानवी क्रौर्य तसेच छळाला बळी पडल्या. “ ‘हमास’ला आम्ही राखेच्या ढिगार्यात परिवर्तीत करू,” अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी व्यक्त केलेली संतप्त प्रतिक्रिया पूर्णपणे समर्थनीय. हे युद्धच आहे, असे म्हणत नेतान्याहू यांनी ‘हमास’ला नेस्तनाबूत करण्यासाठी लढाईला प्रारंभ केला आहे.
‘हमास’ने केलेली कृत्ये दहशतवाद हा किती क्रूर, भयावह, अमानवी असतो, हेच दाखवून देतात. भारतातही २०१४ पूर्वीपर्यंत अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले. ते केव्हा होतील, याची कोणतीही निश्चित वेळ नव्हती. अगदी मुंबई-पुण्यापर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतात खोलवर घुसून हल्ले केले. निरपराध नागरिकांचा बळी घेतला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही, असे म्हणत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवल्याने, भारतातील परिस्थिती बदलली आहे. इस्रायल मात्र गेली कित्येक दशके, त्याविरोधात लढा देतच आहे.
’हमास’ने इस्रायलवर का हल्ला केला, याची एक शक्यता, अशी वर्तवली जात आहे की, इस्रायलला अनपेक्षितपणे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर झालेला हल्ला प्रतिकाराची संधी देणार नाही. त्याचवेळी ‘हमास’मध्ये अंतर्गत संघर्ष वाढीस लागले आहेत. निधीअभावी त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने, इस्रायलवर निर्णायक हल्ला ‘हमास’ने केला असावा, असेही मानले जात आहे. तसेच इस्रायलची सौदी अरबशी आणि मध्य-पूर्वेतील अन्य मुस्लीम देशांशी जवळीकही संपुष्टात यावी, हाही यामागचा उद्देश असू शकतो.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष हा गुंतागुंतीचा आहे. ‘हमास’ने दहशतवादाला पाठबळ देत या लढ्याची सूत्रे अप्रत्यक्षपणे आपल्या हाती घेतली आहेत. झिओनिस्ट चळवळीने ज्यू मातृभूमीच्या स्थापनेसाठी १९००च्या प्रारंभी चळवळ हाती घेतली, तेव्हाच इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षाची बीजे रुजली. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने १९४८ मध्ये इस्रायलची स्थापना करण्यासाठीचा ठराव मंजूर केला. पॅलेस्टिनी राज्याचे विभाजन त्यासाठी करण्यात आले. १९४८ मध्ये इस्रायल आणि अरब यांच्यात झालेल्या युद्धात अरबांचा पराभव झाला आणि इस्रायलची स्थापना झाली. तेव्हापासून इस्रायल-पॅलेस्टिनी असा संघर्ष सुरू आहे.
दहशतवादी ‘हमास’
‘हमास’ ही पॅलेस्टिनी सुन्नी, कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना आहे. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची शाखा म्हणून तिची १९८७ मध्ये स्थापना झाली. इस्रायलची राखरांगोळी करण्याचा ठराव, या संघटनेने मांडला होता. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात झालेले करार ‘हमास’ला मान्य नाहीत. गाझा पट्टीचे प्रशासकीय नेतृत्व याच संघटनेकडे असून, याच गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायल, अमेरिका, कॅनडा, युरोपीय महासंघाने तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तथापि, युरोपमधून ‘हमास’ला अर्थसाहाय्य केले जाते. युरोपमधील अनेक देश ‘हमास’च्या दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देतात; तसेच तिला रसद पुरवतात. ‘हमास’च्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत २०१४ मध्ये लष्करी कारवाई केली होती. मध्य-पूर्वेतील शांतता सध्यातरी संपुष्टात आली असून, या संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज अधोरेखित झाली आहे. १९६७ मध्ये इस्रायलने वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतल्यापासून हा भाग सतत धगधगता राहिला आहे. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा करून इस्रायलने वसाहती उभारल्या, असा आरोप पॅलेस्टिनी करतात.
...हे तर ‘ज्यू राष्ट्र!’
पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्र म्हणून राहण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातो. तसेच पॅलेस्टिनींनी शांततेचे सर्व प्रस्ताव नाकारले असून, ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण हक्क इस्रायलला आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या दहशतवादी संघटनेने शेकडो इस्रायली नागरिकांची हत्या केली, हे विसरून चालणार नाही. ‘हमास’ ही इस्रायलच्या सुरक्षेला धोका असून, तिला थांबवलेच पाहिजे, असे इस्रायलचे असलेले मत रास्त असेच. आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायल-हमास संघर्ष मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘हमास’ने ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरवले आहेत. अमेरिकेनेही शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे. इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील तणाव, गाझा पट्टीतील आर्थिक अस्थिरता आणि इस्रायली आणि पॅलेस्टिनी यांच्यातील धार्मिक मतभेद यासह अनेक घटकांमध्ये, या लढाईचे मूळ आहे. ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून ओळखले जाते, तर पॅलेस्टिनी तिला हक्कांसाठी लढणारी कायदेशीर प्रतिकार चळवळ म्हणून मान्यता देतात. ‘हमास’ने केलेल्या या हल्ल्यामुळे हिंसाचाराची व्याप्ती वाढली आहे, हे कोणीही नाकारणार नाही. इस्रायलने याचे चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवातही केली आहे. मध्य-पूर्व हा प्रदेश अस्थिर म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातील अस्थिरता यामुळे वाढणार आहे. अन्य इस्लामी कट्टर संघटना ‘हमास’ला पाठबळ देण्याची शक्यता वाढीस लागली आहे. लेबनीज अतिरेकी गट ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर रॉकेट डागून, यात उडी घेतली आहे. मध्य पूर्वेतील हा लढा आता निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली असून, ‘हमास’चा पूर्ण पाडाव केल्याशिवाय इस्रायल थांबणार का, हाच मुद्दा आहे.