नव्या आव्हानांसाठी भारतीय लष्कर सज्ज

    23-Jul-2025   
Total Views | 10

भारतीय लष्कर आपल्या कार्यपद्धतीत एक ऐतिहासिक व निर्णायक बदल घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२६-२७ पर्यंत लष्कराच्या बहुतांश कार्यक्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ‘मशीन लर्निंग’ आणि ‘बिग डेटा अॅनालिटिस’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविषयी...


ड्रोन ऑपरेशन्स, पाळत ठेवणे, लढाईसाठीचे प्रशिक्षण आणि गुप्तचर माहिती गोळा करण्यापासून ते पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक गोष्टीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा भारतीय लष्कराचा मानस आहे. एका अहवालानुसार, भारतीय लष्कराला सजगता वाढवण्यासाठी अशा क्षमतेची आवश्यकता आहे, जी प्रचंड प्रमाणातील माहिती काही सेकंदांत प्रक्रिया करू शकेल. यासाठी लष्कर अनेक उपकरणे आणत आहे. मोठ्या दस्तऐवजांना पटकन समजून घेण्यासाठी ‘टेस्ट समरीझर’ जे मोठ्या भाषिक मॉडेल्सच्या मदतीने काम करतात, ‘एआय’वर चालणारे चॅटबॉट्स जे प्रत्यक्ष संवाद साधून त्वरित उत्तरे देतात आणि आवाजी आज्ञांना तत्काळ लिहून रूपांतरित करणारी ‘व्हॉईस टू टेस्ट’ प्रणाली या सर्व गोष्टी लष्करात येऊ घातल्या आहेत.

चेहरा ओळखणारी तंत्रे वापरण्याचीही तयारी झाली आहे, जी शत्रू किंवा संशयित व्यक्ती ओळखतील. तसेच संशयास्पद वर्तन किंवा पॅटर्न्स शोधणार्या प्रणाली वापरण्यात येतील. ड्रोन, उपग्रह, विमाने आणि जमिनीवरच्या सेन्सर्समधून आलेली माहिती एकत्र करून ती थेट मिशनदरम्यान वापरण्यात येईल. यामुळे कमांडर्सना अधिक योग्य आणि वेळेवर निर्णय घेता येतील. या सर्व तांत्रिक पायाभूत सुविधा रणांगणावर माणसांवरचा धोका कमी करतील आणि गती व अचूकता वाढवतील.

हा तांत्रिक बदल आणण्यामागे ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईची शिकवण खूप महत्त्वाची ठरली. मे महिन्यात पार पडलेल्या या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला. या कारवाईत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे ठामपणे दाखवून दिले की, भविष्यातील युद्धं केवळ शस्त्रावर अवलंबून राहणार नाहीत, तर तंत्रज्ञानावरच लढली जातील. कोण किती वेगाने, हुशारीने आणि प्रभावीपणे तंत्रज्ञान वापरतो हेच निर्णायक ठरेल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वितेने भारतीय लष्कराला हेही शिकवले की, रणांगणावरील परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते आणि त्यासाठी त्या क्षणीच डेटा संकलन व विश्लेषण करणे अत्यंत गरजेचे आहे.

या संक्रमणासाठी भारतीय लष्कराने विशेष कार्यदल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ‘एआय’ तज्ज्ञांचा समावेश असेल आणि हे कार्यदल ‘डायरेटोरेट जनरल ऑफ इन्फर्मेशन सिस्टम्स’च्या अखत्यारीत काम करेल. यात लष्कराच्या विविध शाखांतील अधिकारी असतील. त्यांच्या जबाबदार्यांमध्ये लष्करी कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, तांत्रिक क्षमता वाढवणे, डेटा शेअरिंग व समाकलन सुलभ करणे आणि ‘एआय’ सिस्टम्सची देखभाल करणे या गोष्टींचा समावेश असेल. हे कार्यदल ‘कॉम्बॅट ट्रेनिंग सिम्युलेशन्स’, पुरवठा व्यवस्थापन, गुप्तचर पाळत, सोशल मीडिया व बातम्या यांसारखी उघड माहिती पाहणे, ऑपरेशनची आखणी, शत्रूच्या दुर्बल गोष्टी शोधणे, लक्ष्य निश्चिती, जीपीएस न चालणार्या भागात नेव्हिगेशन आणि उपकरणांची पूर्वसंकेत देणारी देखभाल अशा विविध कामांमध्ये ‘एआय’चा वापर सुनिश्चित करेल.

लष्कराची खरेदी करताना पाळले जाणारे ‘जीएसयूआर’ (जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट्स) हे निकषही आता बदलले जाणार आहेत. नव्या साधनांमध्ये ‘एआय’ असणे आवश्यक ठरेल. जुन्या उपकरणांमध्येही शय असल्यास ‘एआय’चे घटक बसवले जातील. ‘डीजीआयएस’मध्ये एक ‘एआय’ लॅबोरेटरी उभारण्यात येत आहे. येथे नवनवीन ‘एआय’ मॉडेल्स तयार होतील आणि चाचणी केली जाईल. हे मॉडेल्स लष्करापुरते मर्यादित न राहता, नौदल व हवाई दलातही वापरले जातील, जेणेकरून तीनही दले समन्वयाने काम करू शकतील.

भविष्यातील युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे निर्णय घेण्याचा वेग वाढेल आणि सामरिक रणनीती नवी उंची गाठेल. ड्रोन स्वरूपातल्या हल्ल्यांपासून सायबर हल्ल्यांपर्यंत आणि माहितीच्या युद्धापर्यंत सर्व गोष्टीत तंत्रज्ञान निर्णायक ठरेल. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे हे शिकायला मिळाले की पारंपरिक रणनीती आता पुरेशी राहणार नाही, तर तांत्रिक सजगतेसह अधिक लवचिकता आवश्यक आहे. भविष्यातील युद्ध डेटा, वेग आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असतील आणि भारतीय लष्कराने त्याची तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात अमेरिका, चीन आणि रशिया यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, भारतीय लष्करही आता त्यांच्या पंक्तीत उभे राहात आहे. अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून लष्करी ‘एआय’ संशोधनात अग्रेसर आहे. त्यांच्या ‘डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेट्स एजन्सी’ने युद्धभूमीसाठी अनेक स्वयंचलित प्रणाली, ड्रोन स्वार्म्स, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणार्या प्रणाली विकसित केल्या आहेत. अफगाणिस्तान आणि इराकमध्येही त्यांनी ‘एआय’चा वापर करून युद्धातील धोके कमी केले व निर्णयक्षमता वाढवली.

चीननेदेखील गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ‘एआय’वर आधारित रणनीती राबवायला सुरुवात केली आहे. त्यांचा ‘इंटेलिजंटाइजेशन वॉरफेअर’ हा दृष्टिकोन भविष्यातील युद्धे केवळ यांत्रिकी नव्हे, तर बुद्धिमान पद्धतीने लढायची असतील, हे दाखवतो. चीनने मोठ्या प्रमाणावर ड्रोन फ्लीट, स्वयंचलित क्षेपणास्त्र प्रणाली आणि सायबर वॉरफेअर यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रशियाचाही भर स्वयंचलित रणगाडे, रोबोट सैनिक आणि सायबर हल्ल्यांवर आहे. युक्रेन युद्धात त्यांनी ‘हायब्रीड वॉरफेअर’च्या माध्यमातून माहिती युद्ध आणि तांत्रिक हल्ले यांचा प्रभावी वापर केला आहे.

भारतीय लष्कराच्या ताज्या योजनांमुळे हे स्पष्ट होते की, भारत कोणत्याही बाबतीत मागे राहू इच्छित नाही. ठराविक उद्दिष्टे, निश्चित वेळापत्रक आणि प्रामाणिक हेतू यामुळे लष्कर अधिक वेगवान आणि कुशल बनणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुभवातून शिकत आणि भविष्यातील युद्धांसाठी तयारी करत, भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवा अध्याय लिहित आहे. रणांगणावर फक्त शौर्य नाही, तर बुद्धिमत्ता आणि विज्ञानही तेवढेच महत्त्वाचं आहे, हे भारतीय लष्कर पुन्हा सिद्ध करत आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121