नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या घोषणांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणादरम्यान गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घरांसाठी परवडणारी कर्जे लागू करण्याबाबत घोषणा केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी घरांसाठी सौरऊर्जा सुनिश्चित करण्याचीही गरज बोलून दाखविली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी योजनांच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनीआज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे जगभरातील भारताच्या चेतनेमध्ये आणि क्षमतेमध्ये एक नवीन आकर्षण आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत असल्याचेही नमूद केले होते.
१०० पदके ही ऐतिहासिक कामगिरी – पंतप्रधान
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूने, 100 पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे, संपूर्ण देश रोमांचित झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या विजयी चमूचे पंतप्रधान येत्या 10 ऑक्टोबर रोजी स्वागत करणार असून त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. पंतप्रधानांनी आज एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. ते म्हणाले, "आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एक ऐतिहासिक कामगिरी! आपल्या खेळाडूंनी 100 पदकांचा मैलाचा टप्पा पार केल्या बद्दल संपूर्ण देश रोमांचित झाला आहे. अशी अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच आज भारत हा ऐतिहासिक क्षण बघू शकतो आहे. प्रत्येक खेळाडूच्या विस्मयचकित करणाऱ्या या कामगिरीने इतिहास घडवला आणि आमची हृदये अभिमानाने भरली आहेत. येत्या 10 तारखेला आमच्या आशियाई खेळांच्या चमूचे आयोजन करण्यास आणि आमच्या खेळाडूंशी संवाद साधण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”