गंगटोक : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. या घटनेतून अद्याप सावरले नसतानाच आता पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आला आहे. सिक्कीममधील आणखी एक तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शाको चू तलावाची स्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. राजधानी गंगटोकपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या लाचेन व्हॅलीतील शाको चू तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. असे झाल्यास सिक्कीममध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सिक्कीममध्ये ढगफुटी होऊन तिस्ता नदीला पूर आल्याने तेथील लष्कराचा कॅम्प वाहून गेला. या पुरात लष्करातील २३ जवान बेपत्ता झाले होते. यापैकी ७ जवानांने मृतदेह सापडले आहेत. तसेच अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.
आतापर्यंतर जवळपास २४१३ लोकांना वाचवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरुच आहे.