मुंबई : गोरेगावमधील सात मजली जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली होती. या घटनेची आमदार आदित्य ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही विरोधक आहोत, आम्हाला आरोप लावणं सोपं असतं. पण आता आरोप करण्याची ही वेळ नाही. ज्या काही चौकशी असतील. त्यामध्ये दुर्घटना कशी घडली? कोणामुळे घडली? आग कशी विझली? हे सर्व माहीत पडेल. पण कितीही कोणी आरोप केले तरी आम्ही जबाबदार विरोधी पक्ष आहोत. आम्ही आज आरोप करणार नाही. जे काही चौकशीत समोर आणायचे असेल, ते आम्ही जबाबदारपणे आणू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "या आगीत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ४० जण अजून जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रार्थना एवढीच आहे की जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत. अर्थात या घटनेची चौकशी होईल. कारवाई जी काही व्हायची आहे ती होईल. पण या घटनेतील सगळ्यांना धीर देणे हे आता महत्त्वाचे आहे." असं आदित्य ठाकरे म्हणाले.