मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डासांची उत्पत्ती स्थळे केली नष्ट

    05-Oct-2023
Total Views |

palika

मुंबई :
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंगी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शोध मोहीम राबविली आहे. या शोध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डेंगी आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. नागरिकांनीदेखील त्यांच्या स्तरावर घरात आणि सोसायटी परिसरात नियमित पाहणी करावी, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसात हिवताप (मलेरिया) आणि डेंगी या दोन्ही आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. यापैकी हिवताप या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंगीचा प्रसार 'एडिस' डासांमुळे होतो. अशा स्थितीत योग्य ती काळजी घेवून व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर डासांची उत्पत्ती रोखली जावू शकते. पर्यायाने आजारांचा फैलाव होणार नाही. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी पालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असून ही कामे निरंतर सुरू असतात. त्यासोबतच, या उपाययोजना प्रत्येक व्यक्तिने आपल्या स्तरावरदेखील करणे गरजेचे आहे. कारण, डेंगी आजार पसरवणाऱ्या एडिस डासांची उत्पत्ती घरात व घराच्या अवतीभोवती होत असल्याने या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.

नियमितपणे सर्व स्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृती मोहीमदेखील नियमितपणे राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘एनोफिलीस’ आणि 'एडिस' या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली जातात. यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून कार्यवाही केली जाते.

पालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९४ हजार ९९७ डेंगीच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देऊन तेथील १ कोटी ९९ लाख ७ हजार ८२२ केंटनरची तपासणी केली आहे. तपासणी मोहिमेदम्यान अनेक घरांना २ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या जातात. अशा १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये ८३ लाख ९४ हजार ५३० घरांना भेटी देऊन ८९ लाख ६६ हजार २४० कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ५३ हजार ४९६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. त्याबरोबरच २०२१ मध्ये ८१ लाख ६६ हजार १३ घरांना भेटी देऊन ८६ लाख ९४ हजार ७९६ कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान आढळून आलेली ४६ हजार २५९ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती.

कीटक नाशक विभागाने डेंगीसोबतच मलेलिया आजाराला कारणीभूत असलेल्या ऍनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थळे देखील नष्ट केली आहेत. या मोहिमेअंतर्गत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ७०१ मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी २० लाख ३ हजार २७४ घरांना भेटी देऊन ५ लाख ९६ हजार ३९१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. तसेच २०२२ मध्ये ३० हजार ९२ घरांना भेटी देऊन ३ लाख ९२ हजार ६० कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ८ हजार १९५ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती. तर २०२१ मध्ये ३७ हजार ६१४ घरांना भेटी देऊन २ लाख ४७७ कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ८ हजार ८५६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती.
 
डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरी प्रयत्न करतच आहे. याबरोबरच नागरिकांनीदेखील महानगरपालिकेच्या सुचनांनुसार आपल्या घरातील आणि घराचा परिसर स्वच्छ ठेऊन या आजाराचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे. डेंगी आणि मलेरियाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमिवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील सर्व सहायक आयुक्त यांना आपापल्या विभागात डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी संयुक्त पथके तयार करून प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

झोपडपट्टी आणि इतर क्षेत्रात डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरणारे जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू हटवण्यासाठी संयुक्त कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात यावा. यासाठी कीटक नाशक विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सहाय्यक अभियंता (परिरक्षक) आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनादेखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यांनी दिल्या आहेत.


घरामध्ये अथवा घराशेजारील परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी आणि खबरदारी संदर्भात घनकचरा विभागाच्या वतीने घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती करावी. तसेच नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये 'मुंबई अगेन्स्ट डेंग्यू' हे अॅप डाउनलोड करून घ्यावे. जेणेकरून या अॅपच्या माध्यमातून डासांची उत्पत्तीची ठिकाणे आणि घ्यावयाची काळजी याबाबतची अधिक माहिती मिळेल. यामुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास आणि डेंगीचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असेदेखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यांनी नमूद केले आहे.

नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष करू नये. ताप आल्यास महानगरपालिका दवाखाना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला भेट देऊन वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.

मलेरिया आणि डेंग्यू आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी हे करावे-
• दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक (Mosquito Repellent ) औषधांचा वापर करावा.
• कुलर, फ्रीज (डिफ्रॉस्ट ट्रे आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा, सर्व जलस्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.

डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाका, यासह ही काळजी घ्यावी-
• बाल्कनीत प्लॅट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे.
• धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक.
• कूलर, बाथरूम आणि टाक्यांमध्ये गळती.
• उघड्या बादल्या किंवा पाण्याचे डबे जे नियमितपणे वापरले जात नाहीत.
• शोभिवंत फुलांच्या फुलदाण्या किंवा पाण्यासह शोपीस.
• बोन्साई वनस्पती आणि इनडोअर वनस्पती.
• डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाजूचे कपडे घाला.

हे करू नये-
• जुने टायर,पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळा, कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.
• डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे ड्रम, पाणी साठविण्याची भांडी इत्यादी बंद ठेवा.
• जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) खबरदारीचे उपाय-
• गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळा.
• खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा.
• पाणी उकळून प्यावे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121