भगवान वाल्मिकी आणि समरसता मेळा

    28-Oct-2023
Total Views | 75
Article on Bhagwan Valmiki

दि. २६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रोहिणी परिसरातील जापनीज पार्क येथे वाल्मिकी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्मसिंग कर्माजी यांच्या संघटनेने हा मेळा आयोजित केला होता. नवरात्रीचे नऊ दिवस आणि रावण दहन झाल्यानंतर पुढे चार दिवस असा त्याचा कालावधी होता. या मेळ्यात मी सहभागी व्हावे, असा दिल्लीचे संघ कार्यकर्ते रितेश अग्रवाल यांनी आग्रह केला. अगोदर मी त्यांना ‘नाही’ म्हटले. कारण, एका छोट्या भाषणासाठी एवढ्या लांबचा प्रवास करण्यासाठी मन आणि शरीर तयार होत नाही. मग अमोल पेडणेकर यांनी खूप आग्रह केला. ‘विवेक’साठी जाणं कसं आवश्यक आहे, हे सांगितलं आणि कार्यक्रमाला जाण्याचे ठरले. कालच्या महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्ताने या एकूणच अनुभवाचे शब्दचित्रण....

विमानतळावर उतरल्यापासून ते रोहिणीपर्यंतच्या रस्त्यांवर कार्यक्रमाचे छोटे होर्डिंग्ज लागले होते. त्यावर माझा फोटो होता. अशा प्रकारचे होर्डिंग्ज पाहायची सवय नसल्यामुळे मलाच खूप ओशाळल्यासारखे झाले. सवयीप्रमाणे विषय कसा आणि काय मांडायचा, याची तयारी करून गेलो. भगवान वाल्मिकी म्हणजे रामायण आणि रामायण म्हणजे मर्यादापुरुषोत्तम राम. मर्यादापुरुषोत्तम रामाचा भारतीय जीवनावरील जबरदस्त प्रभाव, समरसतेचा भाव वगैरे वेगवेगळे मुद्दे काढले होते. जेव्हा कार्यक्रमस्थानी गेलो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, नेहमीसारखे भाषण करण्याची काही ही जागा नव्हे.

अतिशय भव्य मंच उभा केला होता. भगवान वाल्मिकींची अतिशय सुंदर प्रतिमा तिथे ठेवली होती. पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने दीपप्रज्ज्वलन केले. प्रथेप्रमाणे आयोजकांनी माझा सत्कार केला. त्या भागातील प्रसिद्ध कवी कन्हैया मित्तल यांचे ‘भगवान वाल्मिकी आणि रामायण’ यावरील जोरदार गायन सुरू झाले. त्यानंतर ‘हनुमान चालिसा’ या भक्तिगीतावर नृत्यनाटिका सादर करण्यात आली. डोळ्याचे पारणे फिटावे, इतकी ती अप्रतिम झाली. कवी मित्तल यांनी आपल्या काव्यातून समरसतेचा संदेश दिला. भगव्याचा जयजयकार केला. हिंदू असण्याचा गौरव केला. त्यांच्या गाण्यातील प्रत्येक ओळ समरसतेचा भाव व्यक्त करणारी होती.

आयोजक कर्माजी वारंवार सांगत होते की, “आज समरसता दिवस आहे. जरी या मेळाव्यात वाल्मिकी समाजाची संख्या अधिक असली तरी सर्व जातीवर्गाचे लोक इथे संमेलित झाले होते. आमचा उद्देश समरस समाजजीवन निर्माण करण्याचा आहे आणि म्हणून आम्ही याठिकाणी सर्वांना समावून घेतले आहे.” माजी केंद्रीय मंत्री जटियाजी मंचावर आले आणि त्यांनीही आपल्या छोट्या भाषणात महर्षी वाल्मिकी यांचे स्थान आपल्या समाजात किती श्रेष्ठ आहे, हे ‘तुलसी रामायण’ आणि ‘वाल्मिकी रामायण’ यांच्या आधारे सांगितले.

हा सर्व अनुभव घेत असताना माझे मन कधी भूतकाळात गेले, मला समजलेच नाही. १९८५ साली छत्रपती संभाजीनगरच्या समता सभागृहात मा. दामूअण्णा दाते यांच्या पुढाकाराने बैठक झाली. या बैठकीत ‘सामजिक समरसता मंच’ या नावाने नवीन काम सुरू करण्याचा निर्णय झाला. मी, भिकूजी इदाते, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, सुखदेव नवले, मोहनराव गवंडी आणि इतर अशी कार्यकर्ती मंडळी उपस्थित होतो. १९८५ साली झालेल्या बीजाचे रुपांतर लोकसंस्कृतीमध्ये झाल्याचा अनुभव मी दिल्लीला घेत होतो.

छ. संभाजीनगरच्या १९८५च्या बैठकीत याची कल्पनादेखील आम्ही केलेली नव्हती. ज्यांना अस्पृश्य असे म्हटले जाते, ते सगळे आपले समाजबांधव आहेत, आम्ही सर्व एका रक्तबीजाचे आहोत, एका संस्कृतीचे आहोत आणि एका भारतमातेची संतान आहोत, आमच्यात कुणी स्पृश्य नाही, अस्पृश्य नाही, ईश्वरी अंश धारण करणारे आम्ही सर्व मानव आहोत, ही आमची वैचारिक प्रेरणा होती. ही प्रेरणा शुद्ध, सात्विक, शाश्वत आणि सनातन असल्यामुळे काम वाढत गेले. उपेक्षा, विरोध आणि स्वीकार या मार्गाने ते अखिल भारतीय झाले, सहजपणे झाले.

कर्माजी यांच्याशी माझा पूर्वपरिचय नव्हता. त्यांनी दिल्लीमध्ये हे काम स्वयंप्रेरणेने सुरू केले. संघाशी ते जोडले गेले. समरसतेचा भाव जगू लागले. समरसतेचे काम सर्व समाजाला बरोबर घेऊनच करावे लागते आणि तसा त्यांनी प्रयत्न केला, त्याचे दृश्यरूप मी या मेळाव्यात पाहत होतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, एखादी संकल्पना लोककलेत गेल्याशिवाय ती जनमान्य होत नाही. भाषणे, परिसंवाद, पुस्तक, पुस्तिका यांचे महत्त्व आहेच. परंतु, या माध्यमातून चालणारे कार्य समाजातील विशिष्ट वर्गापुरते मर्यादित राहते. तो जनसामान्यांचा विषय होत नाही. जनसामान्यांचा विषय होण्यासाठी लोकगीते, लोककाव्य, लोकनृत्यनाटिका, यातून ते प्रकट व्हावे लागते. तसा प्रयत्न आम्ही मंच म्हणून केला असे नाही; परंतु संकल्पनेचे अंगभूत सामर्थ्यच एवढे असते की, ही प्रक्रिया आपोआप घडत जाते.

भगवान वाल्मिकींचे जीवन आणि रामायण यामध्ये ही अद्भुत शक्ती आहे. मी माझ्या दहा-बारा मिनिटांच्या भाषणात भगवान वाल्मिकी मानवजातीतील आद्यकवी आहेत. आद्य छंद रचनाकार आहेत, आद्य कथाकार आहेत आणि आद्य वैश्विक कवी आहेत. त्यांचा राम हा मानव आहे. हा मानव कर्तव्यधर्म जगत राहिला, तो मानवाचा आदर्श कर्तव्य धर्म झाला. हा रामरुपी मानव सर्व समाजाला बरोबर घेऊन राज्य करीत राहिला आणि समरसतेचे रामराज्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ महान राजा झाला. रामाशिवाय भारतीय जीवनात ‘राम’ नाही. आपण स्वतःला हिंदू म्हणतो, ’गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे म्हणतो. हे हिंदूपण आम्हाला भगवान वाल्मिकीने दिले, त्यांच्या रामायणाने दिले. हे वाल्मिकींचे सामर्थ्य ईश्वरी शक्तीचे सामर्थ्य आहे. कालांतराने त्यांचा राम हा मनुष्य न राहता, लोकांनी त्याला ईश्वराचे रूप दिले. सीता, सीता न राहता ‘मय्या सीता’ झाली. लक्ष्मण केवळ पाठचा भाऊ न राहता, रामाचेच प्रतिरूप झाला आणि बजरंगबली सामर्थ्य, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक झाला. भारतात निर्माण झालेली भक्ती संप्रदायाची गंगोत्री बजरंगबलीच्या भक्तीत आहे. शब्द तोकडे पडावेत इतके रामायणाचे सामर्थ्य अफाट आहे.

दिल्लीतील वाल्मिकी मेळ्याच्या कार्यक्रमात जर मी गेलो नसतो, तर जीवनातील एका अविस्मरणीय कार्यक्रमास मी मुकलो असतो. दृष्टी आणि दिशा देणार्‍या आयोजनापासून वंचित झालो असतो.शरीरधर्माप्रमाणे प्रवासाचे कष्ट होतात. पण, शरीर चालविणारे मन अशा कार्यक्रमाने प्रचंड ऊर्जावान होते. भगवान वाल्मिकी सर्व आयोजकांना अशीच ऊर्जा आणि शक्ती देवो, अशी प्रार्थना करून, मी माझ्या भावशब्दांना विराम देतो.

रमेश पतंगे
९८६९२०६१०१
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121