मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १० दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला. त्याची सुरुवात दि.२७ ऑक्टोबरपासून झाली. दरम्यान वांद्रे ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासंदर्भात नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनच्या २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदिवली, मालाडसह अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
या ब्लॉकमुळे प्रवाश्यांना आपल्या निश्चित वेळेपेक्षा एक ते दोन तास आधी घरातून किंवा कामावरून बाहेर पडावे लागतं आहे. तरीदेखील ट्रेनच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकात दिसून आली. काही ठिकाणी प्रवाशांची ट्रेनमध्ये चढण्यावरून बाचाबाची ही झाली. त्याचे व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागाने ट्रेनच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाचे परिपत्रक ही प्रसिद्ध केले आहे. त्यात दिवसभरात विरार ते चर्चगेट ये-जा करणाऱ्या प्रत्येक ट्रेनबद्दल तिच्या वेळेबद्दल माहिती देण्यात आली आहे.