‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत देवी-देवतांच्या रथापासून रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र करण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असाच आहे. भारतीय शिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
‘चांद्रयान’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रकाशित केलेल्या पुस्तकात देवी-देवतांच्या रथापासून ते रावणाच्या पुष्पक विमानापर्यंतचा उल्लेख करण्यात आला आहे. संशोधनाला पुराणांचे संदर्भ जोडल्यामुळे ‘एनसीईआरटी’चा हा निर्णय नव्या वादंगाला तोंड फोडणार, हे निश्चित. भारताच्या गेल्या महिन्यात यशस्वीपणे पार पडलेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेचे यश शाळा-महाविद्यालयांतून साजरे करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची सूचना स्वागतार्ह अशीच. अवांतर वाचनासाठीच्या या पुस्तिकेत वैदिक काळापासून भारतात विमाने होती, उडणार्या वाहनांचा शोध लागला होता, अशा आशयाचे उल्लेख आहेत. विमानशास्त्र या ग्रंथात त्याचा उल्लेख केला आहे.
रावणाच्या पुष्पक विमानाचा उल्लेख रामायणात आहे. विश्वकर्माने सूर्याच्या धुळीकणांपासून ते तयार केले होते, असा संदर्भ आहे. वेद आणि विज्ञान यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असाच. वेद हे जगातील सर्वात जुने ज्ञात धर्मग्रंथ असून, त्यामध्ये विज्ञानासह विविध विषयांवर विपुल प्रमाणात ज्ञान आहे. विज्ञान हे निरीक्षण आणि प्रयोगांद्वारे नैसर्गिक जगाचा केलेला अभ्यास असे म्हणता येईल. सभोवतालचे जग समजून घेण्यासाठी तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विज्ञानाची मदत होते. या पार्श्वभूमीवर वेद आणि विज्ञान यांना एकत्र आणून, आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक जाणून घेणे आणि त्याचा उपयोग वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल, याबाबत प्रयत्न होणे नितांत गरजेचे.
वेद आणि त्यांची शिकवण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठीही विज्ञानाचा वापर करता येईल. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि खगोलशास्त्र अशा विविध क्षेत्रांत वेदांमध्ये जे वैज्ञानिक ज्ञान आहे, त्यावर संशोधन करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेद आणि विज्ञान या दोन्हींची शिकवण देणारा शैक्षणिक कार्यक्रम विकसित करता येईल. जेव्हा सर्वसामान्यांना त्यांच्या संस्कृतीची आणि वैज्ञानिक प्रगतीची जाणीव असते, त्यांचा अभिमान असतो, तेव्हा राष्ट्रीय अभिमान वाढण्यास त्याची मदत होते. सामाजिक एकता, आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो. भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केल्याने जगभरातील लोकांना भारतीय संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल. त्याचवेळी वैज्ञानिक प्रगतीला प्रोत्साहन दिल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये रुची वाढण्यास त्याची मदतच होणार आहे. या क्षेत्राकडे अधिकाधिक तरुणांनी संधी म्हणून पाहिले, तर नवनवे शास्त्रज्ञ देशात तयार होतील. भारतीय संस्कृती तसेच वैज्ञानिक प्रगती याला चालना दिल्याने, विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीबद्दल तसेच इतिहासाबद्दल रुची निर्माण होईल.
भारत हा विविध संस्कृती आणि भाषा वापरात असलेला वैविध्यपूर्ण देश. साहेबांच्या वसाहतवादी मानसिकेतेने भारतीय संस्कृतीला दुय्यम महत्त्व दिले. पाश्चात्य संस्कृतीचा चुकीचा पगडा सामान्यांच्या मनावर बसला. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी तसेच भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होण्यासाठी, अशा उपाययोजना अत्यंत आवश्यक. भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत. शालेय कार्यक्रम, जनजागृती मोहीम तसेच अन्य उपक्रमांमार्फत सरकार भारतीय संस्कृती तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती यांच्याबद्दल शिक्षित केले जाऊ शकते. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना तसेच अस्मिता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.
भारतीय संस्कृती, वैज्ञानिक प्रगती यांना चालना दिली, तरच सामान्यांना याची माहिती होईल. इंग्रजांनी १८३५ मध्ये मॅकाले शिक्षण पद्धत भारतीयांवर लादली. या शिक्षण पद्धतीने भारतातील प्राचीन गुरुकूल परंपरा मोडीत काढली; तसेच वसाहतवादी मानसिकता लादण्यावर या पद्धतीने भर दिला. इंग्रजी भाषेवर आधारित या पद्धतीने समृद्ध अशा भारतीय परंपरांचा विसर पाडला आणि इंग्रजीचे भूत डोक्यावर लादले. शिक्षण हे इंग्रजी भाषेतूनच घेतले पाहिजे, असा चुकीचा संदेश तिने दिला. आज एकविसाव्या शतकात शिक्षण मातृभाषेतून घेतले, तर प्रगती अधिक होते, हे जगात सर्वमान्य झाले आहे. मात्र, इंग्रजांनी पारंपरिक शिक्षण पद्धतींचा र्हास कसा होईल; तसेच संस्कृती आणि मूल्यांचा कसा विसर पडेल, याचीच पूर्ण काळजी घेतली. नवीन शैक्षणिक धोरण हे सरकारने २०२० मध्ये सादर केले आहे. ते भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे असेच आहे. शिक्षण हे अधिक समावेशक, न्याय्य तसेच उच्च गुणवत्तेचे कसे होईल, याची पुरेपूर काळजी त्यात घेण्यात येत आहे.
भारतीयत्व हे यात केंद्रस्थानी. भारतीय इतिहास, संस्कृती आणि भाषा यांच्या शिकवणीला यात महत्त्व आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची तसेच भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करवून देणे, यावर ही पद्धती भर देते. एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज भारतीयांची नवी पिढी घडवण्यासाठी, ही पद्धती काम करत आहे. प्रादेशिक भाषेत किंवा मातृभाषेत शिकवण्याचे महत्त्व यावर, ही पद्धती भर देते. प्रभावीपणे शिकण्यास तसेच संस्कृती समजून घेण्यास ते अधिक सोयीचे होते. भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सहिष्णुता, करुणा आणि आदर यांसारख्या भारतीय मूल्यांना ती प्रोत्साहन देते. एक चांगली व्यक्ती म्हणून विद्यार्थी घडवण्यावर भर देण्यात येत आहे. जे समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची मानसिकता बाळगतील. ही पद्धती अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. मात्र, शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची तसेच एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीयांची नवी पिढी ती तयार करेल, हा विश्वास आहे.
जो देश आपली संस्कृती, आपला इतिहास विसरतो, त्याचे भविष्यदेखील धोक्यात येते. कारण, संस्कृती ही देशाची ओळख असते. मूल्ये आणि श्रद्धा बळकट करण्यास ती महत्त्वाची भूमिका बजावते. इतिहास ही स्मृती. भूतकाळ समजून घेण्यास तसेच चुकांमधून शिकण्यास त्याची मदत होते. देशाचे भवितव्य हे भूतकाळातून शिकून वर्तमान घडवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. २०१४ नंतर भारतीयत्व आणि भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असलेले दिसून येते. सण आणि परंपरांचे पालन करण्याकडे भर दिला जात आहे. दिवाळीसारख्या सणांची वाढती लोकप्रियता अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊस या आपल्या निवासस्थानी अनिवासी भारतीयांसाठी दिवाळीच्या फराळाचे आयोजन करत आहेत. भारतीयत्व आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन राष्ट्रीय अस्मिता आणि एकता मजबूत करण्यास मदत करत आहे. भारताचा प्रभाव जगभरात वाढत आहे. जागतिक पटलावर भारत अधिक आत्मविश्वासपूर्ण तसेच ठामपणे वाटचाल करताना म्हणूनच दिसून येतो आहे.