एक काळ असा होता. जेव्हा राजेमहाराजे आपल्या आवडत्या सरदाराला बक्षिस म्हणून सोन्या - चांदीचे अलंकार, आभुषणे देत असतं. त्यावेळी हे सोने- चांदीचे दागिणी मिळवण्यासाठी अनेक सरदार आपल्या मालकाला खुश करण्यासाठी काम करत. आता ही असेच एक प्रकरण घडलंय. पण इथे मालक घोटाळे बाज आणि सरदार भ्रष्टाचारी आहेत. हाच काय तो फरक. नुकतेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. ईडीने जाहिर केलेल्या आरोपपत्रानुसार हा घोटाळा घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर कॉन्ट्रक्टचा मोबदला म्हणून बीएमसी अधिकारी आणि काही नेत्यांना ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची सोन्याची बिस्किटे, नाणी आणि गोल्ड बार देण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.त्यामुळेच ह्या कोविड घोटाळ्यातील गोल्ड कनेक्शन काय आहे? ईडीने आरोपपत्रात घेतलेली सहा नावे कोणती? या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून कोणाचं नाव पुढे आलायं. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
याआधी खिचडी घोटाळा काय होता. हे आपण एका व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केला. आता सोन्याच्या बिस्किटांचा घोटाळा आपण जाणून घेणार आहोत. नुकतेच ईडीने आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात ईडीने म्हणटले आहे की, दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात 100 टक्के कर्मचारी असल्याचे भासवले गेले मात्र प्रत्यक्षात सुमारे 50 टक्केच कर्मचारी तैनात होते, ज्यामुळे कोविड काळात रुग्णांना भेट देणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण पडत होता. त्यामुळे जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाली. आणि त्यातून १०० टक्के कर्मचारी तैनात असल्याचं दाखवत बनावट बिलं आणि कागदपत्रांच्या माध्यमातून ३२ कोटी ४४ लाख रुपये कोविड घोटाळ्यातील आरोपींनी मिळवले.
मुळात वरळी आणि दहिसर या दोन केंद्रांचे कंत्राट २०२० मध्ये लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला देण्यात आले होते. मात्र कंपनीच्या भागीदारांनी कोविड घोटाळा करत बेकायदेशीर रित्या पैसे कमावले. यात संजय शहा आणि राजीव साळुंखे ,कर्मचारी अरविंद सिंग ,हेमंत गुप्ता , दहिसर केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांची नावे ईडीच्या आरोप पत्रात सांगण्यात आली आहेत. दरम्यान याआधी कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोपामुळे दि. ५ ऑगस्ट रोजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर कोविड जंबो सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली होती.
मग आता ईडीने जारी केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा म्हणजे, कोविड जंबो सेंटरचे बोगस कागदपत्रे दाखल करून कंत्राट मिळवल्यानंतर कंपनीच्या भागीदारांनी BMC अधिकारी आणि इतर लोकांमध्ये 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने वाटप केले. हे पैसे सोने, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात देण्यात आले,असा ईडीने दावा केलाय.मग पुढे यात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोविड जंबो सेंटरच्या कंत्राटातून मिळालेल्या पैशातून संजय शहा यांनी सोने खरेदी केले. नंतर हे सोने सुजित पाटकर यांना देण्यात आले आणि पुढे हे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आले. इतकंच काय तर वैद्यकीय कर्मचार्यांच्या संख्येवर दुर्लक्ष करण्यासाठी पाटकर यांनी अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या, असा ही दावा ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे.या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयात सुजित पाटकर यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी अमंतबजावणी संचालनालयानं ८००० पानांच आरोप पत्र दाखल केलं. या ८ हजार पानाच्या आरोप पत्रासह एक सीडी ही जोडण्यात आलेली आहे. त्यांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
पंरतु आधी उंदीर घोटाळा, आश्रय घोटाळा, पिण्याच्या पाण्याचा घोटाळा, इलेक्ट्रिक बस घोटाळा , मृतांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा, खिचडी घोटाळ्यानंतर समोर आलेल्या गोल्ड घोटाळ्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावलेल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरिताची खिचडी खाणारी, कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा करणारे, औषध खरेदी करतांना बाजारभावापेक्षा २५ ते ३० टक्के जास्त भावाने खरेदी करणारे यांच्यामुळे बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्यावेळी आपल्या कामाने सर्वसामान्यांची मने जिंकण्याऐवजी भ्रष्टाचाराची पोळी भाजून खाणारे सगळेच मला भ्रष्टाचाराच्या महारोगाने ग्रस्त वाटतात.