मुंबई : महाराष्ट्र टॅक्सी, रिक्षा, कॅब चालक, डिलीव्हरी संयुक्त कृती समितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल - २ येथे गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई एअरपोर्ट टॅक्सी रिक्षा युनियन, मुंबई टॅक्सी चालक मालक सेना, मुंबई टॅक्सी युनियन, भारतीय टॅक्सी चालक संघ,खालसा कॅब, उपनगर रिक्षा चालक संघ आणि अन्य कामगार संघटनांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कोरोना काळापूर्वीची पार्किंग व्यवस्था आणि प्रिपेड व्हाउचर्सच्या दरात वाढ करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा. परमिट आणि फिटनेस परवानग्यांचा कालावधी पुढिल दोन वर्षांसाठी वाढवण्यात यावा. तसेच ई-चलान बाबत सर्वच चालकांमध्ये नाराजी आहे. त्याकरता राज्य शासनाने पुर्नविचार करावा. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अॅग्रिगेटर गाईडलाईन्स २०२० ची अंमलबजावणी करावी. केंद्र सरकारने तयार केलेल्या वेल्फेअर कोड २०२० मधील तरतुदींच्या आधारे टॅक्सी, रिक्षा, कॅब चालक, डिलीव्हरी क्षेत्रात काम करणारे कामगारांसाठी कल्याण महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते.
तरी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुपारी १२.०० च्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळास भेटीसाठी बोलवले होते. यावेळी कृती समितीचे नेते अॅड्. उदयकुमार आंबोणकर, प्रशांत सावर्डेकर, तौकीफ शेख, ईर्शाद अली, अभिजीत राणे, राकेश मिश्रा, जयवंत सावंत, गिरीष विचारे, आशिष गुजर, चेतन आंबोणकर, अण्णासाहेब जावळे, बाबा कांबळे, उत्तम ससाणे, अमरजितसिंग आनंद, बिलाल खान, प्रकाश सावर्डेकर आणि इतर अनेक उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी टॅक्सी, रिक्षा, कॅब चालकांच्या मागण्यांबाबत सरकार विचार करत आहे आणि लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले आहे. तसेच अॅग्रिगेटर गाईडलाईन्स प्रमाणे महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा, कॅब चालकांच्या संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचे काम अंतिम टप्यात असून लवकरच सदर नियमावली राज्यात लागू केली जाईल. तरी, उपरोक्त सकारात्मक चर्चेमुळे संयुक्त कृती समितीने तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून महिन्याभरात शासन कोणकोणते निर्णय घेणार यावरुन आंदोलनाची पुढील दिशा निश्चीत करण्यात येईल असा इशारा टॅक्सी, रिक्षा, कॅब चालक संघटनेने दिला आहे.