भारतीय मजदूर संघ पंचपरिवर्तनाच्या बिंदूंवर विशेष मोहीम राबवणार : हिरन्मय पंड्या

    22-Jul-2025   
Total Views |

मुंबई : भारतीय मजदूर संघाच्या ७० गौरवशाली वर्षांच्या पूर्ततेनिमित्त बुधवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रम संपन्न होत आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची उपस्थिती असेल. भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष हिरन्मय पंड्या यांनी याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. भारतीय मजदूर संघ पंचपरिवर्तनाच्या बिंदूंवर विशेष मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय मजदूर संघाविषयी माहिती देताना हिरन्मय पंड्या म्हणाले, भारतीय मजदूर संघाचा प्रवास २३ जुलै १९५५ रोजी भोपाळमध्ये सुरू झाला. या प्रसंगी, २३ जुलै २०२४ रोजी भोपाळ येथूनच ७० वर्षांचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. भारतीय मजदूर संघ केवळ पगार-भत्ता-पदोन्नतीसाठी लढत नाही तर सामाजिक जबाबदाऱ्या देखील स्वीकारते.

पंचपरिवर्तनातील पर्यावरण, सामाजिक समरसता, स्वदेशी (स्वबोध) या तीन विषयांवर भारतीय मजदूर संघ आधीच काम करत होते. आता त्यांच्या कार्यपद्धतीत कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य हे दोन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. ऑगस्टपासून पुढे या पाच विषयांवर जिल्हा पातळीवर त्यांच्या सदस्यांसह आणि समाजासोबत व्याख्यानमाला आयोजित करून व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे हिरन्मय पंड्या यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, डिसेंबर २०२४ पासून व्यापक कामगार संपर्क साधण्यात आला आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये जिल्हा पातळीवर महिला आणि युवा परिषदा आयोजित करण्यात आल्या. ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी झाले होते. या काळात, भारतीय मजदूर संघाशी संबंधित संघटनांचा देशभरात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि नवीन संघटना स्थापन झाल्या.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक