मुसळधार पावसाने मुंबई शहरातील सात तलावांची पातळी ८५.३२ टक्क्यांवर!

    22-Jul-2025
Total Views |

the-level-of-seven-lakes-in-mumbai-city-is-at-8532-percent
 
मुंबई : मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मुंबई शहरात पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांची पातळी कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावातील पाणीसाठा हा आता ८५.३२ टक्क्यांवर पोहचला आहे.
 
दरम्यान, या सर्व सात तलावांतील एकत्रित पाणीसाठा हा १२,३४,८३६ दशलक्ष लीटर झाला आहे. दैंनदिन वापरासाठी दररोज मुंबई महानगरपालिकेकडून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार, भातसा, तुळशी या सात तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. दरम्यान, मुबंई शहरात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तानसा तलाव ९४.५९ टक्के, मोडक सागर तलाव १०० टक्के, मध्य वैतरणा तलाव ९४.९१ टक्के, अप्पर वैतरणा तलाव ७६.६४ टक्के, भातसा तलाव ८२.४० टक्के, विहार तलाव ५६.१५ टक्के आणि तुळशी तलाव ५७.५२ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
 
यातील मोडक सागर, मध्य आणि अप्पर वैतरणा तलाव हे दहीसर चेक नाका ते वांद्रे आणि शहराच्या पश्चिमेकडील भागांना पाणीपुरवठा करतात. तर विहार, भातसा, तुळशी या तलावातून मुंबईच्या पूर्वेकडील मुलुंड चेक नाका ते सायन आणि पुढे कुलाबापर्यंतच्या भागांना पाणी वितरीत केले जाते.
 
हवामान विभागाचा येलो अर्लट जारी
 
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अर्लट जारी केला, ज्यात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजासह मुसळधार पाऊस आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २१ जुलै ते २२ जुलै रोजी सकाळी ८ पर्यंत मुंबई शहरात ६५.६९ मिमी पावसाची नोंद झाली असून पूर्व उपनगरात ४८.८७ मिमी, तर पश्चिम उपनगरात ६१.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.