मुंबई : उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या कावड यात्रे दरम्यान जातीय दंगली भडकवण्याचा कट उत्तर प्रदेश पोलिसांनी उधळून लावला आहे. मुझफ्फरनगरच्या काकरवली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी तीन आरोपींना याप्रकरणी अटक केली. पाकिस्तानातील एक जूना व्हिडिओ व्हायरल करून वातावरण चिघळवण्याचा त्यांचा डाव होता.
माध्यमांशी बोलताना सहारनपूरचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणाले, श्रावण महिन्यात कावड यात्रा सुरक्षितपणे पूर्ण व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मुझफ्फरनगर हा एक संवेदनशील जिल्हा असून सुरक्षेच्या उद्देशाने एटीएस आणि आरएएफ तैनात करण्यात आले आहेत. समाज माध्यमांवरही विशेष देखरेख ठेवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'काकरवली युवक एकता व्हॉट्सअॅप ग्रुप' वर एका व्यक्तीचा व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मन विचलित करणारी दृश्ये दाखवण्यात आली होती व बजरंद दराच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिमांना मारले जात असल्याची ऑडिओ क्लिप जोडली होती. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केले आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध सुरू केला. तपासानंतर पोलिसांनी नदीम, मानशेर आणि रिश या तिघांना अटक केली. आरोपींच्या चौकशीदरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानातील मुझफ्फरगढ जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. सध्या या टोळीतील अनेक साथीदारांची नावे समोर आली आहेत, ज्याचा तपास सुरू आहे.