नवदुर्गांपैकी आजची पाचवी देवी शीतला माता. या देवीचे मंदिर मुख्यत्वे तीन ठिकाणी पाहायला मिळते. केळवे-माहीम, दादर माहीम आणि अलिबाग. ही देवता वाडवळ समाज, गौड सारस्वत ब्राह्मण समाज आणि आगरी-कोळी या समाजबांधवांची कुलदेवता आहे. तिच्या तीन मंदिरांविषयीचे रहस्य आजच्या लेखमालेत उलगडूया.
तीन मंदिरांमागील कथा
मंदिर ही एक सामाजिक संस्था असते. तिच्या भोवती संस्कृतीचे अनेक धागे गुंतलेले असतात. देवतेचे स्थान मध्यवर्ती असते. माणसे अनेक कारणाने स्थलांतर करतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धेचे रूप असलेली दैवतेसुद्धा आपल्यासोबत नव्या ठिकाणी घेऊन जातात. केळवे-माहीम गावी समुद्रालगत असलेली, ही शीतलादेवी ही त्यापैकीच एक. या देवीचे मंदिर हे तेथील स्थानिक वाडवळ समाजाचे कुलदैवत. हा समाज किनारी मार्गाने पसरत गेला, तसे मुंबईतील माहीम येथे या देवीचे मंदिर बांधले गेले. याठिकाणी माहीम हे नाव मूळ केळवे-माहीम या गावावरून आले असावे, असा तर्क काढता येतो. तसेच मूळ महिकावती साम्राज्याची राजधानी म्हणून माहीम हे नाव प्रचलित झाले असावे, असा तर्कही नाकारता येत नाही. मुंबईतील माहीम येथे सारस्वत ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने या समाजाकडून देवीची पूजा-अर्चा होते, तर अलिबागमध्ये कोळी-आगरी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील या समाजाचीही शीतला माता कुलदैवत आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये
देवीचे मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही, केवळ संरक्षण हे तिचे कर्तव्य नाही. ती शक्ती प्रदान करते. ऊर्जा देते, प्रेरणा देते. मंदिरासमोर प्राचीन दगडी पुष्करिणी आहेच, तरीही मंदिरात जाताना पाय धुवून जावे. शुचिर्भूत होऊन प्रवेश करावा, यासाठी संपूर्ण मंदिराभोवती पाण्याची पोहळी तयार केलेली आहे. प्रवेश करताना तिला लागूनच जावे लागते.