पार्ले टिळक विद्यालयात ‘अंतरिक्ष’ची भ्रमंती

    09-Jan-2023
Total Views | 59

space exhibition



मुंबई (प्रतिनिधी) :
पार्ले टिळक विद्यालयाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे अंतरीक्ष प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शनिवार ७ आणि रविवार ८ जानेवारी, अशा दोन दिवसात हे प्रदर्शन पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर भरवले होते. मुंबईतील विविध शाळांमधून या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

विलेपार्ले येथे असलेले पार्ले टिळक विद्यालयाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांनी एकत्र येऊन ‘अंतरीक्ष – द स्पेस एक्झीबिशन’ या अंतराळ प्रदर्शनाचे ७ आणि ८ जानेवारी रोजी आयोजन केले होते. विद्यालयातील मैदानावर हे प्रदर्शन भरले असून नेहरू प्लॅनेटेरियमचे संचालक अरविंद परांजप्ये यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात प्रशस्त सात दालने असून अंतरिक्षाविषयाची सर्व माहिती विविध रंजक पद्धतींनी यांमध्ये सादर करण्यात आली होती. वातावरणाचे स्तर, सूर्यमाला, ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा याविषयी विविध मॅाडेल्स, चार्ट्स तसेच दृकश्राव्य माध्यमातून विस्तृत माहिती देण्यात आली. याशिवाय दर्शकांना अवकाशयानातून अवकाश भ्रमणाचा अनुभव देण्यासाठी कल्पकतेने अवकाशयानाची मांडणी करण्यात आली होती. अंतराळवीराचे अवकाशातील जीवन, त्याचा दिनक्रम हे सर्व अवकाशयानाच्या आतील रचनेतून दर्शकांना अनुभवता आले. याबरोबरच भारतीय प्राचीन साहित्याचे अवकाशासंदर्भातील योगदान याविषयी असलेल्या चित्रफितींचे कौतुक करण्यात आले. बोरीवली, गोरेगाव ई. ठिकाणच्या शाळांसोबतच सुमारे दहा हजार विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

“विद्यार्थ्यांना अंतरिक्षाबद्दल कुतुहल वाटावे, या क्षेत्रातील घडामोडींची, संधींची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांनी हे प्रदर्शन आयोजित केले होते. विद्यार्थी पालक आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या सर्वांच्या प्रतिक्रियांवरून प्रदर्शनाचा उद्देश सफल झाला असे निश्चितपणे म्हणता येईल”, असे मत पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121