नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण देश दिल्लीतील अंजलीच्या अपघाताने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील एक एक माहिती धक्कादायक आणि संशयास्पद आहे. पोलीसांचा तपासही मंद गतीने सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. आरोपींविरोधात लावण्यात आलेल्या कलमांमुळेही अंजली सिंहच्या घरच्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. हा अपघात नसून ही क्रूर हत्याच आहे, असेही तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे. तिला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शासन झाले पाहीजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत कडेकोट बंदोबस्त असतो. पोलीस आयुक्त स्वतः प्रत्येक घटनेचा आढावा घेत असतात. नाकाबंदी, चेकपोस्ट, तपासणी असा कडेकोट बंदोबस्त लावून दारू पिणाऱ्यांवर आणि धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींवर चाप बसवण्याचे काम पोलीस करत असतात. अशातच अंजली सिंहचा मृतदेह वाहानात अडकून १३ किमी पर्यंत फरफटत राहितो पण पोलीसांना त्याचा पत्ताही लागत नाही. पेट्रोलिंगच्या वेळी एकाही पोलीसाला हा प्रकार कसा समजला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या घटनेतील प्रत्यक्षदर्शी दीपकने पोलिसांना तब्बल २२ वेळा फोन केला होता, असे त्याचे म्हणणे आहे. पोलीसांच्या पेट्रोलिंग पीसीआर वाहनालाही त्याने आवाज देत थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पोलीसांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी स्वतः जाऊन पोलीसांत जबाब नोंदविला होता. मात्र, या घटनेशी संबंधित एकाही प्रत्यक्षदर्शींचा पोलीसांनी स्वतःहून शोध घेण्याचा प्रयत्न का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शवविच्छेदनात मुलीच्या मृतदेहाचा मेंदूच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला इतक्या क्रूरतेने कारने फरफटत नेण्यात आले की, तिच्या डोक्याची कवटी फूटून मेंदूच रस्त्यात पडला. त्यापूर्वीच दिल्ली पोलीसांनी या प्रकाराला अपघात असल्याचे म्हटले आहे, मात्र ही एक हलाल पद्धतीने केलेली हत्या आहे, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीसांनी यात आरोपींचाही जबाब नोंदविला आहे. ज्यात आम्ही मोठ्या आवाजात संगीत ऐकत असल्याने मृतदेह वाहनाखाली अडकल्याचे समजले नसल्याचे त्यांनी कारण दिले आहे. मात्र, गाडीखाली २० वर्षीय मुलीचा मृतदेह लटकत असताना कुणालाच कसली कल्पना का आली नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो. पोलीसांनी आरोपींचे हे म्हणणे खरे वाटले का, त्यावर पोलीस उलटतपासणी करणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पीडितेच्या बाजूने आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांना तपास करावा लागतो. मात्र, हा तपास तितक्याच गतीने होणं गरजेचं होतं.
या प्रकरणात दीपक खन्ना, (वय २६) ग्रामीण सेवेत चालक अमित खन्ना, (वय २५), उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्ड विक्रीचे काम करतो कृष्णा, वय २७, कॅनॉट प्लेसमधील स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये कामाला आहे तर मिथुन, वय २६, नरेलातील येथे हेअर ड्रेसर आहे. मनोज मित्तल, वय २७ पी ब्लॉक सुलतानपुरी येथील रेशन विक्रेता आहे. या पाचही जणांना अटक झाली असून पुढील चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी आरोपींची तत्काळ अल्कोहोलिक चाचणी करुन घेतली नाही, असाही आरोप यात करण्यात आला आहे. चाचणीचा निकाल आरोपींच्या जबाबाशी जुळवायला हवा होता. अल्कोहोलिक चाचणी ८० तासांत केव्हाही करता येते मात्र, अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला, असा आरोप त्यांच्यावर होतोयं. गुन्हा घडला ते ठिकाण किंवा अपघाताचे ठिकाण पोलीसांनी सीलही केलेले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणि इतर बघ्यांनी या जागा पायदळी तुडवल्याची भीती आहे, अशा प्रकरणात सहजासहजी पुरावे मिटू शकतात. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून आणखी काही पुरावे मिळत आहेत का याचा तपास करायला हवा होता.
या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे पहाता कलम ३०४ अ आणि १२० ब लावण्यात आले होते. पीडितेच्या आईने बलात्काराचा संशय व्यक्त केला होता. मात्र, बलात्काराचे ३७५ हे कलम जोडले नाही. अर्थात फोरेन्सिक रिपोर्टमध्ये तिच्यावर कुठल्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, अशा कलमांमुळे पीडितेची कायदेशीर बाजू भक्कम झाली असती. पोस्टमॉर्टममधून अत्याचार न झाल्याचे निष्पन्न झाले असते तर ही कलम न्यायालयात शिथील करण्यात आली असती. पोलिसांनी पीडितेच्या आईच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात कारवाई न केल्याचाही आरोप केला जात आहे.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, घरच्यांपर्यंतही ही बाब कळवली नव्हती. पीडित पक्षाला घटना समजून घेण्याचे अधिकार असतात. घटनेची माहिती पोलीसांना देण्याची जबाबदारीही पोलीसांचीच असते. मात्र, आईला त्वरित मुलीच्या मृतदेह पाहू न दिल्याचाही आरोप कुटूंबियांनी लावला आहे. गाडीखाली एका २० वर्षीय मुलीचा मृतदेह आहे आणि तो फरफटतोयं याबद्दल कुणालाही कल्पना न येणे हे निव्वळ अशक्य आहे. ही जाणूनबुजून केलेली हत्याच आहे, असेही कुटूंबियांचे म्हणणे आहे. गाडीखाली एखादा दगड जरी आदळला तरीही चालकाला लगेचच गोष्ट कळते. मात्र १३ किमी बेदरकार चालवणाऱ्या चालकाला मृतदेहाची कवटी फुटेपर्यंत एकदाही गाडी थांबवून पहावेसे वाटला नाही. मृतदेह रस्त्याच्या कडेला कसा फेकला गेला? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.