मुंबई(प्रतिनिधी): मुंबईतील अग्रगण्य विज्ञान महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रुईयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस. पी. मंडळी - सोहनलाल जैन उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळींच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात दि. ३० आणि ३१ जानेवारी रोजी Millets - 2023 A Transdisciplinary Approach to its Resurgence & Sustainability (भरडधान्य २०२३ - पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टीकोन)
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जावे, ही भारताची सूचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने मान्य केली आणि २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’म्हणून घोषित झालेले आहे. या घोषणेनंतर भरडधान्यांच्या उत्पादनाला आणि वापराला चालना देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न वेगाने कार्यान्वित झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातर्फे महाविद्यालयाच्या या परिषदेला वित्तीय सहाय्य जाहीर झाले असून अशा प्रकारचे अनुदान मिळणारे रुईया महाविद्यालय हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने परिषदपूर्व कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता रुईया महाविद्यालयात करण्यात येणार असून या कार्यशाळेत ‘विविध प्रादेशिक आहारात भरड धान्यांचा वापर’ या विषयावर प्रसिद्ध शेफ वरुण इनामदार ह्यांच्यासाहित अनेक जाणकारांचे मार्गदर्शन लाभेल. वरुण इनामदार यांचे भरड धान्यांच्या काही पाककृतींचे प्रात्यक्षिकही कार्यशाळेदरम्यान पाहता येईल. तसेच परिषदेच्या निमित्ताने भरड धान्यांच्या पाककृती स्पर्धेचे आयोजनही करण्यात येत आहे.
पोषकधान्य म्हणून भरडधान्यांचे महत्त्व, भरडधान्यांपासून अन्नपदार्थ उद्योगांसाठी संधी व आव्हाने, भरडधान्य उत्पादन- विक्री व व्यापारासंबंधी संस्थात्मक रचना व कायदे यांची सद्यःस्थिती व बदलाची गती, भरडधान्य पोषणमूल्यांचा अभ्यास, त्यांच्या ऐतिहासिक – सामाजिक – सांस्कृतिक संदर्भांची चर्चा आणि सूचना या परिषदेत साकार होणे अपेक्षित आहे. या परिषदेदरम्यान तोंडी वा पोस्टर स्वरुपात शोधनिबंध सादर करण्यासाठी १०० संशोधकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयासोबत ‘मुंबई विद्यापीठ’ आणि ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’ (आय. सी. टी.) हे या परिषदेचे सहआयोजक आहेत. या परिषदेत‘मिलेट मॅन’ म्हणून परिचित असणारे डॉ. खादर वल्ली, यांच्यासहित भारत, इस्त्रायल, इराण, कॅनडा, अमेरिका अशा अनेक देशांतून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या ह्या परिषदेच्या ब्रँड म्बॅसिडर आहेत.